
मुंबई प्रतिनिधी
भाडेवाढ करून सर्वसामान्यांचे कंबरडे मोडणाऱया सरकारने आता पर्यटकांच्या खिशाला कात्री लावली आहे. बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे प्रवेश शुल्क 94 वरून 103 रुपये केले आहे.
तसेच इतर तिकिटांच्या दरातही 10 टक्के वाढ केली आहे. उन्हाळी सुट्टीच्या तोंडावर ही मोठी दरवाढ केली आहे. परिणामी, नॅशनल पार्कमध्ये पर्यटकांची संख्या कमी झाली आहे.
उकाडय़ाने हैराण झालेले मुंबईकर रविवार व इतर सुट्टीत नॅशनल पार्कमध्ये कुटुंबीयांसह फिरायला जातात. कुटुंबीयांसोबत जंगल सफारी करण्याच्या मुंबईकरांच्या आनंदावर सरकारने दरवाढीच्या माध्यमातून पाणी फेरले आहे. नॅशनल पार्कमध्ये प्रवेशासाठी तब्बल 103 रुपये मोजावे लागताहेत. याव्यतिरिक्त लायन सफारी, टायगर सफारी, सायकलिंग, कान्हेरी गुंफा भेट आदी सेवांसाठी वेगळे तिकीट काढावे लागत आहे. त्या तिकिटांच्या दरातही 10 टक्क्यांची वाढ केली आहे. परिणामी, इथे पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला किमान एक हजार रुपयांच्या खर्चाचा भुर्दंड सोसावा लागत आहे. हा वाढलेला खर्च सर्वसामान्य मुंबईकरांच्या आवाक्याबाहेर गेला आहे. त्यामुळे होळी, धूलिवंदन, विकेंड अशा सलग सुट्ट्या येऊनही नॅशनल पार्कमध्ये पर्यटकांच्या संख्येत वाढ झाली नाही. किंबहुना, पर्यटकांच्या संख्येत मोठी घट होत आहे. याबाबत पर्यटन क्षेत्रातील जाणकार चिंता व्यक्त करीत असून सरकारची भूमिका पर्यटनाला ‘मारक’ असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
सूचना पेटीमध्ये सरकारवर संताप
नॅशनल पार्कमध्ये भेट दिल्यानंतर पर्यटकांना त्यांचे अभिप्राय नोंदवण्यासाठी सूचना पेटी ठेवली आहे. यात विविध सेवासुविधांसंबंधी सूचना वा अभिप्राय कमीच, पण सरकारविरोधात संतप्त प्रतिक्रिया अधिक नोंदवल्या जात आहेत. वाढीव तिकीट दरामुळे ‘खिसा’ रिकामा करून घरचा मार्ग धरणारे पर्यटक सरकारविरोधात शिव्यांची लाखोली वाहत आहेत.