
मुंबई प्रतिनिधी
महाकरुणि तथागत भगवान गौतम बुद्धांना बुद्धगया येथे ज्ञानप्राप्ती झाली. बुद्धगया येथील बोधिवृक्षाखाली तथागतांना ज्ञानप्राप्ती झाली. त्या बुद्धगयामधील महाबोधी महाविहार हे बौद्धांचे परमपवित्र जागतिक श्रद्धास्थान आहे.
महाबोधी महाविहार व्यवस्थापन ट्रस्टचा 1949 चा टेंपल ऍक्ट रद्द करून महाबोधी महाविहार ट्रस्टमध्ये सर्व सदस्य हे बौद्ध असले पाहिजेत. असा बिहारच्या विधानसभेत कायदा केला पाहिजे. यासाठी आपण बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना लवकरच भेटणार आहोत. महाबोधी महाविहार मुक्तीसाठी देशभर बौद्धांचे आंदोलन सुरू आहे.
त्या आंदोलनाला रिपब्लिकन पक्षाचा कृतिशील पाठिंबा आहे. राज्यात रिपब्लिकन पक्षाचे महाबोधी महाविहार मुक्तीसाठी आंदोलन सुरू असून या महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनात रिपब्लिकन महिलांनी अग्रेसर व्हावे, असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.
भीमछाया सांस्कृतिक केंद्र येथे रिपब्लिकन पक्षाच्या महिला आघाडी तर्फे जागतिक महिला दिनानिमित्त महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता. या महिला मेळाव्याचे उद्घाटन केल्यानंतर रामदास आठवले यांनी महिलांना मार्गदर्शन केले. यावेळी रामदास आठवले यांच्या पत्नी सीमा आठवले आणि महिला मेळाव्याचे आयोजक उषाताई रामलू, रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर, मुंबई अध्यक्ष सिद्धार्थ कासारे आणि रियाब्लिकन पक्षाच्या सर्व महिला नेत्या पदाधिकारी उपस्थित होते.