
मुंबई प्रतिनिधी
मुंबई महानगरपालिका परीसरातली लहान रस्ते, गल्ल्या यांची स्वच्छता तसेच रस्ते दुभाजक, बॅरिकेड्स, विविध चौंकांची स्वच्छता आणि सौंदर्यीकरण, शासकीय, महानगरपालिका व खासगी रूग्णालय परिसरात स्वच्छता असे विविध टप्पे पार केल्यानंतर आता पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गाची विशेष स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे.
ही स्वच्छता मोहीम सोमवार (17 मार्च 2025) ते शनिवार (22 मार्च 2025) पर्यंत चालणार आहे. या सहा दिवसांच्या काळात दररोज रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत ही मोहीम पार पडणार आहे.
पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्ग स्वच्छ, सुंदर रहावा तसेच राडारोडा मुक्त असावा, हे या मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट आहे. महामार्गावर सौंदर्यानुभवाच्या दृष्टीकोनातून नियमित सुशोभीकरण आणि सुरक्षेच्या उपाययोजना करण्याच्या सूचना अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी दिल्या आहेत.
वाहतुकीला अडसर नाही
या मोहिमेविषयी माहिती देताना उपआयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) किरण दिघावकर यांनी सांगितले की, पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गांवर तसेच त्यांना जोडणाऱ्या रस्त्यांवर सोमवार (17 मार्च 2025) पासून विशेष स्वच्छता मोहिमेला सुरूवात होणार आहे. शनिवार (22 मार्च 2025) पर्यंत ही विशेष स्वच्छता मोहीम दररोज रात्री 10 ते सकाळी 6 या कालावधीत हाती घेण्यात येणार आहे, जेणेकरून वाहतुकीला देखील अडसर होणार नाही आणि स्वच्छतेची कामे देखील जलद आणि चांगल्या पद्धतीने करता येतील.
वाहतूक पोलीस विभागाच्या समन्वयाने ही मोहीम हाती घेण्यात येणार आहे. स्वच्छता कालावधीत वाहतूक विभागाच्या मदतीने गरजेनुसार वाहतूक वळवणे किंवा पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात येतील, जेणेकरून वाहतुकीला कोणताही अडथळा निर्माण होणार नाही. मोहिमेसाठी संयंत्रे, उपकरणे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.