
नागपूर प्रतिनिधी
पतंजली फूड अँड हर्बल पार्क’ संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मिहान, नागपूर येथे ‘पतंजली फूड आणि हर्बल पार्क’चे उदघाटन केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, हा प्रकल्प उभारताना अनेक अडचणी आल्या, पण योगगुरु स्वामी रामदेव बाबा आणि आचार्यजी यांच्या दृढ संकल्पामुळे नागपूर येथे हा भव्य मेगा फूड पार्क उभा राहिला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी विदर्भातील जनतेच्यावतीने या प्रकल्पासाठी योगगुरु स्वामी रामदेव बाबा, आचार्य बाळकृष्ण यांचे आभार मानले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, आचार्य बाळकृष्ण यांनी या प्रकल्पामध्ये संत्र्यासोबतच त्याची साल, बियांसह प्रत्येक घटकावर प्रक्रिया करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. त्यामुळे आगामी काळात शेतकऱ्यांसाठी येथे एक भव्य सुविधा निर्माण होईल. संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या सशक्तीकरणासाठीचे हे कार्य अत्यंत कौतुकास्पद आहे. नागपूरसह विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा प्रकल्प वरदान ठरणार आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, संत्रा फळासोबत इतर फळांवरदेखील याठिकाणी प्रक्रिया होणार आहे, त्यामुळे या फळांना चांगली किंमत मिळेल. तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सूचनेप्रमाणे याठिकाणी नर्सरी उभारण्याचे महत्त्वाचे कामही हाती घेण्यात आले आहे. या नर्सरीसाठी महाराष्ट्र सरकारकडून आवश्यक त्या सर्व सुविधा पुरवल्या जातील असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी आश्वस्त केले.
यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, योगगुरु स्वामी रामदेव बाबा, पतंजली आयुर्वेद लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बाळकृष्ण, राज्यमंत्री आशिष जयस्वाल, आ.आशिष देशमुख, आ. समीर मेघे, भाजपा राष्ट्रीय सह संगठन सरचिटणीस शिवप्रकाश व इतर मान्यवर उपस्थित होते.