
नागपूर प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी पगारवाढीसह १६ मागण्यांसाठी आंदोलनाचा मार्ग निवडला आहे. महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या नेतृत्वाखाली ५ मार्चला राज्यभरातील आगारे आणि विभागीय कार्यालयांसमोर निदर्शने होणार आहेत.
शासनाने एसटी कर्मचाऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप संघटनेने केला आहे.
पाच महिन्यांपूर्वी जाहीर केलेली पगारवाढ एप्रिल २०२० पासून लागू करण्याचे आश्वासन देऊनही ती एप्रिल २०२४ पासून लागू करण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये २०१६-२० च्या एकतर्फी करारातील थकबाकी, २०१८ पासूनचा महागाई भत्ता, शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे ५३% नुसार वाढीव महागाई भत्ता यांचा समावेश आहे. याशिवाय करारानुसार ३% वार्षिक वेतनवाढ आणि ८, १६, २४% दराने घरभाडे भत्त्याची थकबाकी देण्याची मागणी आहे.
नागपूर विभागातील सर्व आठ आगारे, विभागीय कार्यशाळा आणि कार्यालयांसमोर निदर्शने होणार आहेत. महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अजय हट्टेवार यांनी शासनाला मागण्या तात्काळ मान्य करण्याचे आवाहन केले असून अन्यथा उग्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.