
पत्रकार:उमेश गायगवळे
मुंबईतील वडाळ्यात हिट अँड रनची घटना घडली आहे. घरासमोर महिला आणि त्यांचा लहान मुलगा झोपला होता. मात्र, भरधाव वेगाने येणाऱ्या चारचाकी वाहनानं दोघांना चिरडलं.
चालक दारूच्या नशेत होता. या घटनेत तीन वर्षीय मुलाचा जागेवरच मृत्यू झाला आहे. तर, जखमी महिलेवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी तपास करून फरार आरोपीला ताब्यात घेतलंय.
मिळालेल्या माहितीनुसार, जखमी महिला प्रिया लोंढे या रात्रीचे जेवण तयार करून आपल्या घराबाहेर मोकळ्या जागेत बसल्या होत्या. त्यांच्यासोबत त्यांचा मुलगाही होता. दोघेही बाहेर झोपले होते. काही वेळानंतर भरधाव वेगानं कार आली. कारनं रस्त्यावर झोपलेल्या महिला आणि मुलाला चिरडलं.
चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती समोर आली आहे. नंतर कार चालक फरार झाला. कारनं चिरडल्यानंतर चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला तर, महिला गंभीर जखमी झाली आहे. स्थानिक नागरीकांनी धाव घेत महिला आणि मुलाला रूग्णालयात नेलं. मात्र, डॉक्टरांनी मुलाला मृत घोषित केलं.
तर, महिलेवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. महिलेने कारचालकाविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
किडवाई मार्ग पोलिसांनी तपास करून आरोपीला ताब्यात घेतलं असून, त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पुढील तपास पोलीस करीत आहेत.