
मुंबई प्रतिनिधी
राज्यातील २५ हजार अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी राज्यभरात विविध ठिकाणी वसतिगृह उभारणार असल्याची घोषणा राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी रात्री उशिरा केली.
नांदेड जिल्ह्यातील किनवट येथील आयोजित एका कार्यक्रमात शिरसाट बोलत होते. यावेळी मंत्री शिरसाट यांनी किनवट, माहुर आणि हिमायतनगरमध्ये वसतिगृह उभारण्यात येणार असल्याचं स्पष्ट केलं.
मंत्री शिरसाट म्हणाले, “राज्यातील विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा सरकारचं मानस आहे. त्यासाठी किनवट येथे १०० मुलांसाठी तर माहुर आणि हिमायतनगर येथे १०० मुलींसाठी वसतिगृह उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी १५ ते २० कोटी रुपयांची निधी देण्यात येणार आहे.” असंही शिरसाट यांनी जाहीर केलं
पुढे मंत्री शिरसाट म्हणाले, “येत्या तीन ते चार महिन्यात या कामाच्या भूमी पूजनाला स्वत: येणार आहे.” असंही शिरसाट यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना मदत होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मंत्री शिरसाट यांनी यावेळी डॉ. बाबासाहेबांच्या विचारांची ताकद समजून घेण्याचं आवाहनही केलं. ते म्हणाले, “किनवटमध्ये १४ वर्षांपासून धम्म परिषद होते. बाबासाहेबांनी काय निर्माण केलं आहे. ते समजून घेण्यासाठी धम्म परिषदेत आलं पाहिजे. समाज जागरूक होत असेल तरी समाजव्यवस्था परिपूर्ण नाही. अन्याय आणि अत्याचार सुरूच आहेत. समाजाने मागणारे नव्हे तर देणारे व्हावे.” असंही शिरसाट म्हणाले.
यावेळी किनवटचे आमदार भीमराव केराम, हदगावचे आ.बाबूराव कदम कोहळीकर, उमरखेडचे माजी आमदार विजय खडसे, धम्म परिषदेचे स्वागताध्यक्ष प्राचार्य डॉ.मोहनराव मोरे, संयोजक दया पाटील, अध्यक्ष सुनील भरणे आदींची उपस्थिती होती.