
नागपूर प्रतिनिधी
सरहद संस्थेद्वारे आयोजित अखिल भारतीय साहित्य महामंडाळाच्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा बिगूल वाजला असून तब्बल ७१ वर्षांनी देशाच्या राजधानीत हे संम्मेलन होत आहे.
छत्रपती शिवाजी महाराज साहित्यनगरी, ताल कटोरा स्टेडियमवर २१, २२, २३ फेब्रुवारीला साहित्यरसिकांना मेळा भरणार आहे. आठ परिसंवाद, मुलाखत, चर्चासत्र आणि कविसंमेलनाची मेजवानी यावेळी अनुभवता येणार आहे.
ज्येष्ठ लेखिका व लोकसाहित्याच्या अभ्यासक डॉ. तारा भवाळकर या संमेलनाच्या अध्यक्ष असून स्वागताध्यक्ष शरद पवार आहेत. डॉ. मुख्य सभामंडपाचा बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्यात आले आहे. यासह यशवंतराव चव्हाण आणि महात्मा ज्योतिराव फुले अशी सभामंडपांना नावे देण्यात आली आहे.
२१ ला सकाळी ९.३० वा. साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष प्रा. उषा तांबे यांच्या हस्ते ग्रंथदिंडी व ध्वजारोहणाने संमेलनाला सुरुवात होईल. प्रमुख अतिथी नॅशनल बुक ट्रस्ट ऑफ इंडियाचे मिलिंद मराठे राहतील. ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन मावळत्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे यांच्या हस्ते होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे सांस्कृतिक सचिव विकास खरगे उपस्थित राहतील. दुपारी ३.३० वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विज्ञान भवन येथे विशेष उद्घाटन समारंभ निमंत्रितांच्या उपस्थित पार पडणार आहे. यावेळी स्वागताध्यक्ष शरद पवार, प्रमुख पाहुणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संमेलनाच्या अध्यक्ष डॉ. तारा भवाळकर यांची उपस्थिती राहील. त्यानंतर दुसरे उद्धाटन सत्र ६.३० वाजता डॉ. आबेडकर सभामंडपात आयोजित आहे. अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे तर अतिथी म्हणून राज्याचे उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत आणि सांस्कृतिक कार्य मंत्री उपस्थित राहतील. यावेळी संमेलनाध्यक्ष डॉ. तारा भवाळकर यांचे अध्यक्षीय भाषण होईल. त्याचबरोबर पूर्वाध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे यांचेही भाषण होणार आहे. त्यानंतर सायंकाळी ७.३० वा. प्रसिद्ध कवी इंद्रजित भालेराव यांच्या अध्यक्षतेत निमंत्रितांचे कवी संमेलन रंगणार आहेत. यात ४२ कवी सहभागी होणार आहेत.
२२ फेब्रुवारीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभामडपात होणारे कार्यक्रम
सकाळी १० वाजता मराठी पाऊल पडते पुढे हा विशेष मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित आहे. यात रवी पंडित, हणमंतराव गायकवाड, पराग करंदीकर सहभागी असून विशेष पाहुणे साहित्य अकादमीचे सचिव डॉ. के. श्रीनिवासराव आहेत. मुलाखतकार प्रसन्न जोशी आहेत. त्यानंतर १२ वाजता मराठीचा अमराठी संसार हा परिसंवाद रंगणार आहेत. यात डॉ. ज्ञानेश्वर मुळे-डॉ. साधना शंकर, राजदीप सरदेसाई-सागरिका घोष, रेखा रायकर-मनोज कुमार आणि डॉ मंजिरी वैद्य अय्यर-प्रसन्ना अय्यर मराठी अमराठी जोड्यांशी अस्मिता पांडे आणि बाळ कुळकर्णी मनमोकळा संवाद साधणार आहेत. विशेष पाहुणे आ. डॉ. विश्वजीत कदम उपस्थित राहतील. यानंतर दुपारी २ वाजता लेखिका संजीवनी खेर, डायमंड पब्लिकेशनचे दत्तात्रय पाष्टे आणि कमल पाष्टे यांचा विशेष सत्कार होणार आहेत. यानंतर दुपारी २.३० वा. कृष्णात पाटोळे व संच लोकसाहित्य भुपाळी ते भेरवी हा कार्यक्रम सादर करणार आहे. त्यानंतर दुपारी ४ वा. जयदेव डोळे यांच्या अध्यक्षतेत राजकारणाचे मराठी साहित्यात उमटणारे प्रतिबिंब हा परिसंवाद होणार आहे. यात डॉ. समीर जाधव, धीरज वाटेकर, शैलेश पांडे, सुरेश भटेवरा आणि संजय आवटे सहभागी होतील. सायं. ६ वा. मधुरा वेलणकर यांचा मधुरव हा खास कार्यक्रम होणार आहे.