
संभाजीनगर प्रतिनिधी.
दिवाळीनंतर राज्यात दारूच्या किमतीत तीन वेळा वाढ झाली. आता नवीन आर्थिक वर्षात म्हणजेच एप्रिल २०२५ पासून शासन १५ टक्के दरवाढ लागू करण्याच्या विचारात आहे.
तसे झाल्यास यामुळे बार, हॉटेल आणि रेस्टॉरंट चालकांवर वार्षिक ४१ हजार ३२६ रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार पडणार आहे. ग्राहकांनाही दारू महाग मिळणार आहे. दिवाळीच्या काळात हॉट ब्रँड्ससह सर्व प्रकारच्या दारूचे दर वाढले. त्यानंतर रेड वाइन आणि पोर्ट वाइन महागल्या. अलीकडेच बडवायजर (मॅग्नम) बीअरच्या किमतीत वाढ झाली. आता एप्रिलपासून सर्वच प्रकारच्या दारूच्या दरांत वाढ होणार असल्याचे संकेत आहेत.
आरोग्यासह सामाजिकदृष्ट्याही हानिकारक
मद्यपान करणाऱ्यांना कॅन्सरचा धोका असतो. एका ड्रिंकमुळेही आरोग्याला धोका संभवतो. दारूमुळे आरोग्याची हानी होतेच. पण, ती प्यायल्याने नशा येते. त्यामुळे व्यक्तीकडून चुकीच्या कृती घडू शकतात. परिणामी, सामाजिक प्रतिमाही मलिन होते. त्यामुळे दारूही व्यक्तीसाठी हानिकारकच आहे. तिच्यापासून दूर राहणेच योग्य.
असा बसणार फटका
वर्ष २०२४-२५ मध्ये विक्रेत्यांना परवाना नूतनीकरण करण्यासाठी ८ लाख २६ हजार ३५२ रुपये लागत होते. त्यात १० टक्के वाढ यानुसार ८२ हजार ६५२ रुपयांची वाढ होणे आवश्यक होते. मात्र, शासनाने १५ टक्के दरवाढ प्रस्तावित केली. ती लागू झाल्यास १ लाख २३ हजार ९७८ रुपये भरावे लागणार आहेत. त्यामुळे बार, हॉटेल, रेस्टॉरंट चालकांना जास्तीचे ४१ हजार ३२६ रुपये भरावे लागतील. सहाजिकच ही रक्कम बारमालक त्यांच्या खिशातून भरणार नाहीत. ती ग्राहकांकडून काढली जाईल. परिणामी, २६० रुपयांना मिळणारी व्हिस्की २८० ते २८५ रुपयांना ग्राहकांना विकणार असल्याचे बार चालकांनी सांगितले.