मुंबई प्रतिनिधी
मुंबईहून विमानाने प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज, गुरुवार (१९ नोव्हेंबर) रोजी तब्बल सहा तास विमानांचे उड्डाण आणि लँडिंग पूर्णपणे बंद राहणार आहे. विमानतळाचे दोन्ही धावपट्टे सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत बंद ठेवण्यात येणार असल्याने मुंबईतून जाणाऱ्या आणि मुंबईत येणाऱ्या विमानांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी विमानतळाकडे निघण्यापूर्वी आपल्या विमानाचे अद्ययावत वेळापत्रक तपासण्याचे आवाहन विमानतळ प्रशासनाने केले आहे.
दोन्ही धावपट्टे सहा तास बंद
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे संचालन करणाऱ्या मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडने (MIAL) या नियोजित बंदची माहिती यापूर्वीच दिली आहे. त्यानुसार विमानतळावरील दोन्ही क्रॉस रनवे अर्थात RWY 09/27 आणि RWY 14/32 हे गुरुवारी सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत वापरासाठी बंद राहणार आहेत.
या सहा तासांच्या कालावधीत दोन्ही धावपट्ट्यांवरून विमानांचे टेकऑफ आणि लँडिंग होणार नाही. त्यामुळे या वेळेत नियोजित असलेल्या देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय विमानांच्या आगमन आणि प्रस्थानाच्या वेळांमध्ये बदल होऊ शकतो. काही उड्डाणांचे वेळापत्रक पुढे-मागे करण्यात आले असून प्रवाशांना विलंबाचाही सामना करावा लागू शकतो.
नेमके कशासाठी बंद राहणार रनवे?
पावसाळ्यानंतर दरवर्षी विमानतळावर धावपट्ट्यांची विशेष देखभाल आणि दुरुस्ती केली जाते. याच वार्षिक देखभाल कार्यक्रमाचा भाग म्हणून दोन्ही रनवे बंद ठेवण्यात येणार आहेत.
पावसाळ्यात मुसळधार पाऊस, पाणी साचणे आणि सततच्या विमानांच्या वाहतुकीमुळे धावपट्ट्यांच्या पृष्ठभागावर परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे त्यांची सखोल तपासणी करणे आवश्यक असते. या कामामध्ये धावपट्टीच्या पृष्ठभागाची पाहणी, आवश्यक ठिकाणी दुरुस्ती, विमानांच्या टायरमुळे तयार झालेले रबरचे थर हटविणे, धावपट्टीवरील प्रकाशयंत्रणेची तपासणी, मार्किंग आणि पाण्याचा निचरा करणाऱ्या यंत्रणेची देखभाल केली जाणार आहे.
विमानांचे सुरक्षित लँडिंग आणि टेकऑफ सुनिश्चित करण्यासाठी ही प्रक्रिया महत्त्वाची मानली जाते.
सहा महिन्यांपूर्वीच विमान कंपन्यांना सूचना
विमानतळ प्रशासनाने या नियोजित कामाची पूर्वकल्पना विमान कंपन्या आणि संबंधित यंत्रणांना दिली होती. यासाठी एअरमेनना नोटीस (NOTAM) देखील जारी करण्यात आली आहे. त्यामुळे विमान कंपन्यांना आपल्या उड्डाणांचे वेळापत्रक, मनुष्यबळ आणि अन्य परिचालन व्यवस्थेत आवश्यक बदल करण्यासाठी पुरेसा अवधी मिळाला.
विमानतळावरील कामकाज विस्कळीत होऊ नये आणि प्रवाशांची गैरसोय कमीत कमी व्हावी, यासाठी प्रशासनाने नियोजन केल्याचे स्पष्ट केले आहे.
प्रवाशांनी काय काळजी घ्यावी?
आज मुंबई विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी काही महत्त्वाच्या बाबींची खबरदारी घेणे आवश्यक आहे.
विशेषतः सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी आपल्या संबंधित एअरलाइनच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा मोबाइल ॲपवर विमानाचे अद्ययावत वेळापत्रक तपासावे. विमानाच्या प्रस्थानाच्या किंवा आगमनाच्या वेळेत बदल झाला आहे का, याची खात्री करूनच पुढील नियोजन करावे.
महत्त्वाचे म्हणजे, १९ नोव्हेंबर रोजी संपूर्ण दिवस विमानतळ बंद राहणार नाही. केवळ सकाळी ११ ते सायंकाळी ५ या सहा तासांच्या कालावधीत दोन्ही धावपट्ट्यांवरील नियमित विमानसेवा स्थगित राहणार आहे. देखभाल पूर्ण होऊन आवश्यक तांत्रिक परवानगी मिळाल्यानंतर विमानसेवा पुन्हा सुरू होणे अपेक्षित आहे.
मुंबईसारख्या देशातील सर्वाधिक वर्दळीच्या विमानतळावर एकाच वेळी दोन्ही धावपट्ट्या बंद ठेवण्याचा हा निर्णय विमान वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. त्यामुळे आज विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी केवळ तिकीटावरील वेळेवर विसंबून न राहता विमान कंपनीकडून मिळणाऱ्या ताज्या सूचनांकडे लक्ष देणे गरजेचे आहे.


