सोलापूर : प्रतिनिधी
दक्षिण सोलापूर तालुक्यात लग्नासाठी वारंवार तगादा लावत खासगी फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिल्याने १८ वर्षीय डिप्लोमा विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अमूल्या मल्लिकार्जुन भुरळे असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. याप्रकरणी रविकांत महादेव सुरवसे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमूल्या डिप्लोमाच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत होती. ती अभ्यासात हुशार होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून रविकांत सुरवसे हा तरुण तिच्यावर लग्नासाठी दबाव टाकत असल्याचा आरोप आहे. माझ्याशी लग्न कर, अन्यथा तुझे खासगी फोटो सोशल मीडियावर व्हायरल करेन, अशी धमकी तो देत असल्याचे तिच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या सततच्या त्रासामुळे अमूल्या मानसिक तणावाखाली होती. अखेर या त्रासाला कंटाळून तिने मंगळवारी रात्री राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. नातेवाईकांनी तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
या घटनेमुळे भुरळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अमूल्याच्या पश्चात आई-वडील, दोन भाऊ आणि एक बहीण असा परिवार आहे. तिचे वडील मल्लिकार्जुन भुरळे यांनी सिव्हिल पोलीस चौकीत फिर्याद दिली आहे. त्यानुसार रविकांत सुरवसे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.


