मुंबई : प्रतिनिधी
मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडल्याच्या प्रकारामुळे राज्याच्या राजकारणात निर्माण झालेल्या वादानंतर शिवसेनेच्या प्रवक्त्या शायना एनसी यांनी अखेर माफी मागितली आहे. बाळासाहेबांचा अनादर करण्याचा आपला कोणताही हेतू नव्हता, असे स्पष्ट करत त्यांनी शिवसैनिकांची मनापासून माफी मागितली. मात्र, आपल्या कृतीचा आणि वक्तव्याचा जाणीवपूर्वक विपर्यास केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या ‘बिलाँगिंग : ए जर्नी ऑफ लव्ह’ या पुस्तकात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी आक्षेपार्ह उल्लेख असल्याचा आरोप करत शिवसेनेच्या प्रवक्त्यांनी मुंबईतील बाळासाहेब भवन येथे पत्रकार परिषद घेतली होती. या वेळी पुस्तकाच्या प्रतींसह काही छायाचित्रे फाडून निषेध व्यक्त करण्यात आला. मात्र, या आंदोलनात शायना एनसी यांनी बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांचे एकत्रित छायाचित्र फाडल्याने वाद निर्माण झाला.
या घटनेचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर शायना एनसी यांच्यावर टीकेची झोड उठली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. भाजप आमदार प्रवीण दरेकर आणि नवनाथ बन यांनीही या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त करत शायना एनसी यांनी माफी मागावी, अशी भूमिका मांडली.
अखेर या सर्व घडामोडींनंतर शायना एनसी यांनी समाजमाध्यमांवर पोस्ट करून आपली भूमिका स्पष्ट केली. पत्रकार परिषदेत आपण बाळासाहेबांच्या विचारांचा संदर्भ दिला होता. त्यांच्या ज्वलंत विचारांतूनच आपण प्रेरणा घेत असल्याचे त्यांनी सांगितले. बाळासाहेबांचा अनादर करण्याचा आपला कधीही हेतू नव्हता, असेही त्यांनी स्पष्ट केले.
काही माणसं आणि काही नाती आयुष्यभर काळजाच्या एका कोपऱ्यात घर करून राहतात. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे माझ्या आयुष्यातील असेच पितृतुल्य आणि देवतुल्य व्यक्तिमत्त्व.
मी लहान असताना पहिल्यांदा बाळासाहेबांना भेटले. ते माझ्या वडिलांचे अत्यंत जिवलग मित्र होते. आमच्या… pic.twitter.com/6YJPv1vH7p— Shaina Chudasama Munot (@ShainaNC) November 19, 2026


