सातारा प्रतिनिधी
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष-उपाध्यक्षपदाच्या निवडीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने एकत्र येत सत्तेचे समीकरण जुळवले. अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे संचालक उदयसिंह पाटील-निंबाळकर, तर उपाध्यक्षपदी शिवसेनेचे दीपक चव्हाण यांची बिनविरोध निवड झाली. या निवडीमुळे जिल्ह्यातील महायुतीच्या राजकीय समीकरणांना धक्का बसल्याची चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते आणि सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना, वरिष्ठांनी दिलेल्या सूचना महायुतीतील मित्रपक्षांच्या नेत्यांपर्यंत पोहोचवल्या होत्या; मात्र अंतिम निर्णय त्यांनीच घेतला, असे सांगत या घडामोडींपासून स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न केला.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीनंतर अध्यक्ष-उपाध्यक्षपदाच्या निवडीवरून जिल्ह्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. महायुती म्हणून एकत्र राहण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना असतानाही राष्ट्रवादी आणि शिवसेनेने एकत्रित निर्णय घेत पदांची वाटणी केली. त्यामुळे भाजपच्या भूमिकेबाबत आणि महायुतीतील समन्वयाबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. या सर्व घडामोडींवर बोलताना शिवेंद्रराजे यांनी वरिष्ठांच्या सूचनांचे पालन केल्याचा दावा केला.
‘वरिष्ठांचा निरोप मित्रपक्षांपर्यंत पोहोचवला होता’
शिवेंद्रराजे म्हणाले, माझ्याकडे वरिष्ठांनी ज्या सूचना आणि निरोप दिले होते, ते मी महायुतीतील आमच्या सहकाऱ्यांपर्यंत पोहोचवले होते. मित्रपक्षांच्या नेत्यांचे मतही वरिष्ठांपर्यंत पोहोचवले होते. आज सकाळपर्यंत माझ्याकडे आलेल्या सूचना संबंधित मित्रपक्षांच्या नेतृत्वापर्यंत पोहोचवल्या होत्या. मात्र, त्यानुसार निर्णय झाला नाही. जिल्हा बँकेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीबाबत महायुतीच्या वरिष्ठ पातळीवर चर्चा झाली होती. त्यानंतर राष्ट्रवादी आणि शिवसेनेने एकत्र येऊन निर्णय घेतला. याबाबत आता महायुतीच्या वरिष्ठ पातळीवर चर्चा होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्र्यांचा आदेश पाळला, तरी कुरघोड्या झाल्या!
मुख्यमंत्र्यांच्या स्पष्ट सूचना होत्या की, महायुती म्हणूनच निवडणूक लढवायची आणि मागील कटुता पुन्हा निर्माण होणार नाही, याची काळजी घ्यायची. त्यानुसार आम्ही काम केले. निवडणुकीच्या प्रक्रियेत पहिल्यापासून झालेल्या बैठकांना आमदार धैर्यशील कदम यांना सोबत घेऊन गेलो. कोणत्याही बैठका परस्पर घेतल्या नाहीत किंवा कोणाला गुपचूप भेटून तडजोड करण्याचा प्रयत्न केला नाही. असे असतानाही आमच्या उमेदवारांवर कुरघोड्या करण्याचे प्रयत्न झाले. मात्र, पक्ष आणि मुख्यमंत्र्यांच्या आदेशाखातर आम्ही संयमाची भूमिका घेतली, असे शिवेंद्रराजे यांनी सांगितले.
मकरंद पाटील, शंभूराज देसाईंना मुख्यमंत्र्यांचा निरोप दिला
सातारा तालुक्यातील एकगठ्ठा मतदान आपल्या विचाराचे असतानाही मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार माघार घेतली, असा दावा शिवेंद्रराजे यांनी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या सूचना मकरंद पाटील आणि शंभूराज देसाई यांच्यापर्यंत पोहोचवल्या होत्या. त्यानंतर निर्णय त्यांनी घेतला. मी परस्पर कोणाशीही बैठक केली नाही किंवा हातमिळवणी केली नाही. मला भाजप आणि मुख्यमंत्री या दोनच गोष्टी माहिती आहेत, असे सांगत त्यांनी आपली भूमिका मांडली.
‘झालं की आमच्यामुळे नाही, मग बाबांना जाऊन विचारा!’
जिल्हा बँकेतील घडामोडींवरून आपल्याला विनाकारण लक्ष्य केले जात असल्याची खंतही शिवेंद्रराजे यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, काही झालं की आमच्यामुळे झालं आणि काही झालं नाही की बाबांना जाऊन विचारा, अशी भूमिका घेतली जाते. प्रत्यक्षात आम्ही बँकेतून बाहेर आहोत. बँकेत इतर संचालक आहेत. निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर माझा कुठेही उल्लेख झाला नाही. मी काही चूक करत नाही. मग काही घडलं नाही की माझंच नाव पुढे कसं येतं, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सातारा तालुका आणि जावळी तालुक्यातून सुमारे चारशे ते साडेचारशे मतांचे राजकीय महत्त्व होते. एवढी ताकद असतानाही पक्ष आणि मुख्यमंत्र्यांसाठी आपण काम केले, असेही त्यांनी नमूद केले.
राजकीय वचप्यासाठी शेतकऱ्यांच्या बँकेचा वापर नको
जिल्हा बँक ही केवळ राजकीय सत्ताकेंद्र नसून हजारो शेतकऱ्यांच्या जीवनाशी आणि आर्थिक स्थैर्याशी जोडलेली महत्त्वाची संस्था आहे. त्यामुळे राजकीय हेवेदावे किंवा एकमेकांचा वचपा काढण्यासाठी बँकेचा वापर करू नये. असे प्रकार सुरू राहिल्यास बँक अडचणीत येऊ शकते, असा इशाराही शिवेंद्रराजे यांनी दिला.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याच्या चर्चेवरही त्यांनी स्पष्टीकरण दिले. ही भेट केवळ शाहू कला मंदिर, राजपथ आणि राधिका रोडच्या काँक्रिटीकरणासारख्या विकासकामांच्या प्रस्तावांना मंजुरी मिळवण्यासाठी होती. जावळीतील राजकीय वादाबाबत वरिष्ठांकडे कोणतीही तक्रार केली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
एकूणच, सातारा जिल्हा बँकेच्या सत्तावाटपातून राष्ट्रवादी आणि शिवसेनेने आपले राजकीय गणित जुळवले असताना भाजपकडून मात्र मुख्यमंत्र्यांच्या आदेशाचे पालन केल्याचा दावा केला जात आहे. शिवेंद्रराजे यांच्या वक्तव्यामुळे महायुतीतील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा चर्चेत आले असून, या घडामोडींवर महायुतीचे वरिष्ठ नेते काय भूमिका घेतात, याकडे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.


