हुतात्मा दिनानिमित्त मराठी अभ्यास केंद्राचे मध्य व पश्चिम रेल्वेला निवेदन
मुंबई प्रतिनिधी
मुंबई : छठपूजेनिमित्त मुंबई आणि उपनगरांतील रेल्वे स्थानकांवर भोजपुरी गाणी वाजविण्यावरून निर्माण झालेला वाद आता नव्या वळणावर पोहोचला आहे. भोजपुरी गाण्यांसाठी रेल्वे प्रशासन पुढाकार घेऊ शकते, तर महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक असलेल्या हुतात्मा दिनानिमित्त महाराष्ट्र गीत वाजविण्यास हरकत काय, असा थेट सवाल उपस्थित करण्यात आला आहे. येत्या २१ नोव्हेंबरला हुतात्मा दिनानिमित्त महाराष्ट्रातील सर्व रेल्वे स्थानकांवर महाराष्ट्र गीत वाजवावे आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील १०७ हुतात्म्यांच्या बलिदानाची माहिती देणाऱ्या विशेष उद्घोषणा कराव्यात, अशी मागणी मराठी अभ्यास केंद्राने केली आहे. यासंदर्भात मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे तसेच रेल्वे बोर्डाला निवेदने पाठविण्यात आली आहेत. त्यामुळे रेल्वे प्रशासन या मागणीला काय प्रतिसाद देते, याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
छठपूजेच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील सीएसएमटी, वडाळा, नेरुळ, सानपाडा यांसह काही रेल्वे स्थानकांवर भोजपुरी गाणी वाजविण्यात आली होती. या प्रकारावरून मनसे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्यासह मराठी संघटनांनी आक्षेप घेतला होता. महाराष्ट्र दिन, शिवजयंती, गणेशोत्सव आणि अन्य मराठी सणांच्या वेळी रेल्वे स्थानकांवर मराठी गाणी वाजविण्याबाबत अशी तत्परता का दाखवली जात नाही, असा प्रश्नही उपस्थित झाला होता. या वादाच्या पार्श्वभूमीवर मराठी अभ्यास केंद्राने आता थेट हुतात्मा दिनाचा संदर्भ देत रेल्वे प्रशासनाला महाराष्ट्र गीत वाजविण्याची मागणी केली आहे.
१०७ हुतात्म्यांच्या बलिदानाचे स्मरण करा!
२१ नोव्हेंबर १९५५ रोजी संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीसाठी मुंबईत मोठा मोर्चा काढण्यात आला होता. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान झालेल्या पोलीस गोळीबारात अनेक आंदोलकांना प्राण गमवावे लागले. पुढे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात एकूण १०७ हुतात्म्यांनी बलिदान दिले. त्यांच्या त्यागातून १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. या ऐतिहासिक संघर्षाची माहिती आजच्या तरुण पिढीला व्हावी आणि महाराष्ट्राच्या निर्मितीमागील संघर्षाची जाणीव नव्या पिढीपर्यंत पोहोचावी, हा या मागणीमागील प्रमुख उद्देश असल्याचे मराठी अभ्यास केंद्राने स्पष्ट केले आहे.
सकाळी ८ ते रात्री ८ विशेष उद्घोषणा करा!
२१ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत राज्यातील रेल्वे स्थानकांवर ठरावीक अंतराने विशेष उद्घोषणा करण्यात याव्यात, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचा इतिहास, १०७ हुतात्म्यांचे योगदान आणि हुतात्मा दिनाचे महत्त्व प्रवाशांना समजेल अशा पद्धतीने उद्घोषणा प्रसारित कराव्यात. त्याचबरोबर रेल्वे स्थानकांवरील ध्वनिक्षेपकांवरून ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे महाराष्ट्राचे राज्यगीत आणि ‘बहु असोत सुंदर संपन्न की महा’ हे महाराष्ट्र गीत वाजविण्यात यावे, अशीही मागणी करण्यात आली आहे.
केवळ गाणी वाजवून औपचारिकता पूर्ण करू नये, तर रेल्वेच्या जनसंपर्क विभागाने या दिवसाचे ऐतिहासिक महत्त्व प्रवाशांपर्यंत पोहोचविण्यासाठी विशेष उपक्रम राबवावा, असेही केंद्राने सुचविले आहे.
रेल्वे बोर्डाची महाराष्ट्र गीतावर बंदी आहे का?
महाराष्ट्रातील रेल्वे स्थानकांवर स्थानिक भाषा, संस्कृती आणि ऐतिहासिक परंपरांना अपेक्षित स्थान दिले जात नसल्याचा आक्षेप मराठी अभ्यास केंद्राने घेतला आहे. अन्य राज्यांतील सणांच्या निमित्ताने स्थानकांवर गाणी वाजविण्याबाबत रेल्वे प्रशासन पुढाकार घेत असेल, तर महाराष्ट्राच्या ऐतिहासिक दिनानिमित्त महाराष्ट्र गीत वाजविण्यात अडचण काय, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.
प्रवाशांनी अशा प्रकारांबाबत आक्षेप घेतल्यास दिल्लीवरून आदेश असल्याचे सांगितले जाते, असा दावाही केंद्राने केला आहे. त्यामुळे हुतात्मा दिनी महाराष्ट्र गीत वाजविण्यास रेल्वे बोर्डाची काही बंदी आहे का, याबाबत स्पष्ट भूमिका जाहीर करावी, अशी मागणी रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षांकडेही करण्यात आली आहे.
रेल्वे प्रशासनाच्या निर्णयाकडे महाराष्ट्राचे लक्ष!
मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष डॉ. दीपक पवार आणि कार्यवाह आनंद भंडारे यांनी या मागणीसाठी पुढाकार घेतला आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाने मागणीचा सकारात्मक विचार करून संबंधित स्थानकांना आवश्यक निर्देश द्यावेत, अशी विनंती करण्यात आली आहे.
दरम्यान, भोजपुरी गाण्यांच्या प्रसारणानंतर रेल्वे प्रशासनाने वेगवेगळ्या प्रसंगी विशेष विषयांशी संबंधित गाणी आणि जनजागृतीपर संदेश प्रसारित केले जात असल्याची भूमिका मांडली होती. आता महाराष्ट्राच्या हुतात्मा दिनानिमित्त करण्यात आलेल्या मागणीवर रेल्वे प्रशासन काय निर्णय घेते, हे महत्त्वाचे ठरणार आहे. २१ नोव्हेंबरपूर्वी रेल्वे प्रशासनाकडून अधिकृत निर्देश निघतात का, महाराष्ट्र गीत स्थानकांवर घुमते का आणि १०७ हुतात्म्यांना रेल्वेच्या माध्यमातून अभिवादन केले जाते का, याची उत्सुकता निर्माण झाली आहे.


