मुंबई : प्रतिनिधी
मुंबई : काँग्रेस नेत्या तथा खासदार सोनिया गांधी यांच्या ‘बिलॉन्गिंग : अ जर्नी ऑफ लव्ह’ या आत्मचरित्रातील उल्लेखांवरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या पुस्तकात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी आक्षेपार्ह उल्लेख असल्याचा आरोप करत शिवसेना शिंदे गटाने आक्रमक पवित्रा घेतला. पुस्तकाचा निषेध करण्यासाठी सहा प्रवक्त्यांनी पत्रकार परिषदेत पुस्तकाची पाने फाडली. मात्र, निषेध व्यक्त करताना शायना एनसी यांनी चक्क दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचाच फोटो फाडल्याचा प्रकार घडला. त्यामुळे शिंदे गटाची चांगलीच कोंडी झाली असून या घटनेवरून नवा राजकीय वाद निर्माण झाला आहे.
सोनिया गांधी यांच्या आत्मचरित्रात स्वातंत्र्यवीर सावरकर ब्रिटिश सरकारकडे सातत्याने माफीची विनंती करत होते, असा उल्लेख असल्याचे शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या कथित उल्लेखाचा निषेध करत शिंदे गटाच्या प्रवक्त्यांनी पुस्तकाची पाने फाडली. या मुद्द्यावरून ठाकरे गटालाही लक्ष्य करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
या पत्रकार परिषदेला संजय निरुपम, शीतल म्हात्रे, संजना घाडी, शायना एनसी, आनंद दुबे आणि सुशिबेन शहा हे सहा प्रवक्ते उपस्थित होते. सावरकरांच्या कथित अवमानावरून काँग्रेसला घेरण्यासोबतच ठाकरे गटावरही टीका करण्यात आली. मात्र, शायना एनसी यांनी बाळासाहेब ठाकरे यांचाच फोटो फाडल्याचा प्रकार समोर आल्याने शिंदे गटाच्या निषेध आंदोलनावरच प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. सावरकरांच्या अवमानाचा मुद्दा मांडताना बाळासाहेबांचा फोटो फाडला गेल्याने राजकीय चर्चेला नवे वळण मिळाले आहे.


