नवी दिल्ली : वृत्तसंध्या
नवी दिल्ली : चेन्नई सुपर किंग्सचा माजी कर्णधार आणि चाहत्यांचा लाडका महेंद्रसिंह धोनी याने आयपीएलमधून अधिकृतपणे निवृत्ती जाहीर केल्याची बातमी समोर आली आहे. गेली १८ वर्षे आयपीएलमध्ये आपल्या खेळाने आणि नेतृत्वाने छाप पाडणारा ‘माही’ आता मैदानावर खेळताना दिसणार नाही. मात्र, क्रिकेटपासून दूर न जाता चेन्नई सुपर किंग्सने त्याच्यावर मेंटॉरपदाची महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.
धोनीच्या निवृत्तीच्या वृत्तामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये निराशा पसरली आहे. आगामी आयपीएल हंगामात चेन्नईचा संघ धोनीशिवाय मैदानात उतरणार आहे.
दुखापतीमुळे मागील हंगामात एकही सामना नाही
मागील हंगामात दुखापतीमुळे धोनीला एकही सामना खेळता आला नव्हता. त्याने संघासोबत प्रवासही केला नव्हता. त्यामुळे यष्टीरक्षणाची जबाबदारी संजू सॅमसनने सांभाळली होती.
धोनीने आपल्या आयपीएल कारकिर्दीतील शेवटचा सामना २५ मे २०२५ रोजी अहमदाबाद येथे गुजरात टायटन्सविरुद्ध खेळला होता. या सामन्यात त्याला फलंदाजीची संधी मिळाली नव्हती. त्याआधी दिल्ली येथे राजस्थान रॉयल्सविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने १६ धावा केल्या होत्या.
धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईने पाच वेळा जिंकले विजेतेपद
२००८ मध्ये आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून धोनी चेन्नई सुपर किंग्सचा भाग होता. चेन्नई संघावर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली होती, त्या काळात तो पुणे संघाकडून खेळला. मात्र, चेन्नईचे आयपीएलमध्ये पुनरागमन झाल्यानंतर तो पुन्हा आपल्या जुन्या संघात दाखल झाला.
धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईने तब्बल पाच वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले. त्याने कर्णधारपद सोडल्यानंतर रवींद्र जडेजा आणि त्यानंतर ऋतुराज गायकवाड यांच्याकडे संघाची धुरा सोपवण्यात आली. मात्र, धोनीच्या नेतृत्वातील यशाची पुनरावृत्ती इतर कर्णधारांना करता आलेली नाही. आता मेंटॉर म्हणून धोनी संघाला मार्गदर्शन करणार आहे.
अशी राहिली धोनीची आयपीएल कारकीर्द
धोनीची आयपीएलमधील कामगिरी उल्लेखनीय राहिली आहे. त्याने एकूण २७८ सामन्यांमध्ये ३८.३० च्या सरासरीने आणि १३७.४५ च्या स्ट्राइक रेटने ५ हजार ४३९ धावा केल्या आहेत. यामध्ये २४ अर्धशतकांचा समावेश असून नाबाद ८४ ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. त्याने स्पर्धेत २६४ षटकारही ठोकले आहेत. मात्र, संपूर्ण कारकिर्दीत त्याला एकही शतक झळकावता आले नाही.
आता धोनीच्या अनुपस्थितीत चेन्नई सुपर किंग्स नव्या हंगामात कशी कामगिरी करणार आणि मेंटॉर म्हणून त्याची भूमिका कशी असेल, याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
आयपीएल २०२७ पूर्वी खेळाडूंच्या अदलाबदलीला वेग
दुसरीकडे, आयपीएल २०२७ च्या मिनी ऑक्शनपूर्वी रिटेंशनच्या शेवटच्या दिवशी फ्रँचायझींमध्ये मोठ्या प्रमाणावर खेळाडूंची अदलाबदल झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
मागील हंगाम संपल्यानंतर काही दिवसांतच ऋषभ पंतने लखनऊ सुपर जायंट्सची साथ सोडून पुन्हा दिल्ली कॅपिटल्समध्ये प्रवेश केला. या व्यवहारात दिल्लीने आपला फिरकीपटू कुलदीप यादवला लखनऊकडे पाठवले. ऋषभ पंतची लखनऊमधील २७ कोटी रुपयांची डील कमी होऊन दिल्लीसोबत १५ कोटी रुपयांमध्ये निश्चित झाली. तर कुलदीप यादव १३.५ कोटी रुपयांच्या करारासह लखनऊच्या संघात दाखल झाला.
हार्दिक पांड्या पंजाबमध्ये, अर्शदीप मुंबईच्या ताफ्यात
मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स यांच्यातही मोठी खेळाडू अदलाबदल झाली आहे. अष्टपैलू हार्दिक पांड्याने मुंबई इंडियन्सची साथ सोडून पंजाब किंग्समध्ये प्रवेश केला आहे. तर पंजाबचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंह आता मुंबई इंडियन्सकडून खेळणार आहे.
या व्यवहारात पंजाबने हार्दिक पांड्याची जुनी १६.३५ कोटी रुपयांची डील वाढवून १८ कोटी रुपयांचा करार केला आहे. दुसरीकडे, अर्शदीप सिंहचा १८ कोटी रुपयांचा करार कायम ठेवण्यात आला आहे. त्यामुळे आयपीएल २०२७ च्या हंगामापूर्वी संघांच्या रचनेत मोठे बदल पाहायला मिळत आहेत.


