सोलापूर प्रतिनिधी
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील आंबे गावात विहीर खोदकाम सुरू असताना अचानक मातीचा आणि दगडांचा ढिगारा कोसळून चार कामगार त्याखाली अडकले आहेत. गेल्या सात तासांपासून घटनास्थळी बचावकार्य सुरू असून, प्रशासनाकडून कामगारांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. मात्र, बचावकार्य सुरू असतानाच भाजपच्या काही नेत्यांनी कामगारांच्या मृत्यूची घोषणा करत सोशल मीडियावर श्रद्धांजलीपर पोस्ट टाकल्याने या प्रकाराची चर्चा सुरू झाली आहे.
पंढरपूर तालुक्यातील आंबे येथे निवास शिंदे यांच्या शेतात विहीर खोदण्याचे काम सुरू होते. यावेळी अचानक दगड आणि मातीचा मोठा ढिगारा काम करणाऱ्या मजुरांच्या अंगावर कोसळला. त्यामुळे चार कामगार ढिगाऱ्याखाली अडकले. त्यांना बाहेर पडण्याची संधीही मिळाली नाही. घटनेची माहिती मिळताच प्रशासन आणि बचाव पथकांनी घटनास्थळी धाव घेतली.
सोलापूरचे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी एस. कार्तिकेयन स्वतः घटनास्थळी उपस्थित असून बचावकार्यावर लक्ष ठेवून आहेत. माढ्याचे आमदार अभिजित पाटील हेदेखील घटनास्थळी दाखल झाले आहेत. अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. एनडीआरएफचे पथकही घटनास्थळी दाखल होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी दिली. सर्व कामगार विठ्ठलाच्या कृपेने सुखरूप असावेत, अशी भावना आमदार अभिजित पाटील यांनी व्यक्त केली.
बचावकार्य सुरू असतानाच श्रद्धांजली पोस्ट
एकीकडे प्रशासनाकडून कामगारांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती दिली जात असताना दुसरीकडे भाजपच्या काही नेत्यांनी कामगारांचा मृत्यू झाल्याचे गृहीत धरून सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली. यामध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, माजी आमदार प्रशांत परिचारक, भाजप तालुकाध्यक्ष सुभाष मस्के, माऊली हळनवर यांच्यासह पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.
या नेत्यांनी सोशल मीडियावर श्रद्धांजलीपर पोस्ट प्रसिद्ध केल्या. मात्र, बचावकार्य सुरू असतानाच अशा पोस्ट प्रसिद्ध झाल्याने प्रश्न उपस्थित झाले. आपली चूक लक्षात आल्यानंतर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोशल मीडियावरील श्रद्धांजलीची पोस्ट डिलीट केली. त्यामुळे या घटनेबरोबरच भाजप नेत्यांच्या घाईघाईने केलेल्या सोशल मीडिया पोस्टचीही चर्चा सुरू झाली आहे.


