कराड प्रतिनिधी
कराड : विविध गुन्ह्यांतील पाच संशयितांना साताऱ्याला घेऊन जाणाऱ्या पोलिस व्हॅनने कराडमधील गजबजलेल्या भेदा चौकात अचानक पेट घेतला. शनिवारी सायंकाळी सातच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
कराड तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वेगवेगळ्या गुन्ह्यांतील पाच संशयितांना सातारा येथे नेण्यात येत होते. त्यासाठी वापरण्यात आलेली व्हॅन कराड शहर पोलिस ठाण्याची होती. या वाहनात पाच संशयितांसह पाच पोलिस कर्मचारी आणि चालक असे एकूण ११ जण प्रवास करत होते.
व्हॅन भेदा चौकात पोहोचताच शॉर्टसर्किट झाल्याने वाहनाने अचानक पेट घेतला. आग वेगाने पसरू लागल्याने चौकात गोंधळ आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले. आगीची चाहूल लागताच वाहनातील सर्वांनी तातडीने बाहेर पडून सुरक्षित ठिकाणी धाव घेतली.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांनीही मदतकार्य केले. सर्वांच्या तत्परतेमुळे आग आटोक्यात आणण्यात यश आले. मात्र, या आगीत पोलिस व्हॅनचे मोठे नुकसान झाले. वाहनातील कोणालाही दुखापत झाली नसल्याने मोठा अनर्थ टळला.


