स्वप्नील गाडे, गुन्हे वार्ताहर
मुंबई : पवईतील हिरानंदानी परिसरात अवैधरीत्या डिझेलचा साठा करून त्याची विक्री करणाऱ्या तिघांना पवई पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी ४ हजार ५०० लिटर डिझेल, तीन पिकअप वाहने, ३० लोखंडी ड्रम आणि विद्युत पंप असा एकूण ४१ लाख ६२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
१३ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास मौजे कोपरी, वाहनतळासाठी आरक्षित जागा, हिरानंदानी, पवई येथे अवैध डिझेल साठवून विक्री केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पवई पोलिसांनी छापा टाकला असता अफरोज अब्दुल बारी खान (३०), मोहम्मद मोईन नसीम खान (४३) आणि सैबाज इलियास खान (२१) हे कोणताही वैध परवाना किंवा अधिकृत परवानगी नसताना डिझेलचा साठा करून विक्रीच्या तयारीत असल्याचे आढळले.
पोलिसांनी घटनास्थळावरून १५ भरलेले व १५ रिकामे लोखंडी ड्रम, महिंद्रा पिकअप टँकर, महिंद्रा पिकअप, टाटा इंट्रा पिकअप आणि विद्युत पंप जप्त केला. या डिझेलचा स्रोत काय, ते कोठून आणले आणि ते चोरीचे आहे का, याचा तपास पोलीस करीत आहेत.
याप्रकरणी पवई पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ११८८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेतील कलम १२५, २८७, ३०३(२), ३(५), अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ तसेच मोटार स्पिरिट आणि हाय स्पीड डिझेल (नियंत्रण) आदेश २००५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अटक आरोपी मोहम्मद मोईन नसीम खान याच्याविरुद्ध यापूर्वीही व्ही. बी. नगर, आर. सी. एफ., सी. बी. कंट्रोल, विरार आणि कुर्ला पोलीस ठाण्यांत विविध गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक गणेश पाटील करीत आहेत.
पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त मनोजकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त अभिनव देशमुख, पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे, सहाय्यक पोलीस आयुक्त दादासाहेब घुटुकडे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक आत्माजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.


