मुंबई प्रतिनिधी
मराठी चित्रपटसृष्टीचा समृद्ध वारसा, नव्या पिढीचे सर्जनशील प्रयोग आणि चित्रपटांच्या बदलत्या प्रवाहांचा वेध घेणारा महाराष्ट्र शासनाचा अधिकृत ‘चित्रपताका-२०२६’ मराठी चित्रपट महोत्सव येत्या १५ ते १८ नोव्हेंबरदरम्यान मुंबईत रंगणार आहे. चार दिवस चालणाऱ्या या महोत्सवात तब्बल ३३ मराठी चित्रपटांचे प्रदर्शन, नामवंत कलाकारांच्या मुलाखती, परिसंवाद, मास्टरक्लास आणि विविध विशेष कार्यक्रमांची मेजवानी चित्रपटप्रेमींना अनुभवता येणार आहे. महोत्सवाची तयारी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या सहकार्याने महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळातर्फे या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी संकुलात महोत्सवाचे विविध कार्यक्रम पार पडतील. महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील यांनी शुक्रवारी तयारीचा आढावा घेतला. कार्यक्रमस्थळाची पाहणी करून प्रेक्षकांच्या सुविधा, सुरक्षा आणि नियोजनाबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. ज्येष्ठ दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे हे महोत्सवाचे संचालक, तर डॉ. संतोष पाठारे हे क्युरेटर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत.
रविवार, १५ नोव्हेंबर रोजी राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, स्वाती म्हसे-पाटील यांच्यासह चित्रपटसृष्टीतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. दिग्दर्शक नितीन सुपेकर यांच्या अद्याप प्रदर्शित न झालेल्या ‘बंधू’ या चित्रपटाने महोत्सवाची सुरुवात होईल. उपेंद्र लिमये आणि जितेंद्र जोशी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटात दोन भावांमधील भावनिक नात्याची कहाणी उलगडणार आहे. तर १८ नोव्हेंबर रोजी भारतातर्फे ऑस्करसाठी अधिकृत नामांकन प्रवेशिका मिळालेल्या संतोष डावखर दिग्दर्शित ‘गोंधळ’ या चित्रपटाने महोत्सवाची सांगता होणार आहे.
या महोत्सवाचे विशेष आकर्षण म्हणजे ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे, सचिन पिळगांवकर, ज्येष्ठ अभिनेत्री शुभा खोटे आणि दिग्दर्शक ओम राऊत यांच्या विशेष मुलाखती. याशिवाय चित्रपट निर्मिती, पटकथा, दिग्दर्शन आणि तंत्रज्ञान अशा विविध विषयांवर १५ हून अधिक विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. परिसंवाद, मास्टरक्लास आणि संवादात्मक सत्रांच्या माध्यमातून चित्रपटसृष्टीतील अनुभवांची देवाणघेवाण होणार आहे.
नवोदित चित्रपटकर्त्यांना व्यासपीठ मिळावे, यासाठी ‘महाराष्ट्र माझ्या नजरेतून…’ या संकल्पनेवर आधारित लघुपट स्पर्धाही आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील संस्कृती, लोकजीवन आणि प्रादेशिक वैशिष्ट्ये चित्रभाषेतून मांडण्याची संधी या माध्यमातून मिळणार आहे. तसेच ‘पुस्तक ते सिनेमा’ या उपक्रमातून प्रकाशित मराठी पुस्तकांच्या लेखकांना दिग्दर्शक, निर्माते आणि पटकथाकारांशी थेट संवाद साधता येणार आहे.
विशेष म्हणजे, चारही दिवसांच्या महोत्सवातील सर्व कार्यक्रमांचा लाभ घेण्यासाठी केवळ १०० रुपये नोंदणी शुल्क आकारले जाणार आहे. या शुल्कातून मिळणारी संपूर्ण रक्कम दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे मनोरंजनासोबतच सामाजिक बांधिलकी जपण्याचाही उपक्रम महोत्सवातून राबविला जाणार आहे.
‘चित्रपताका’ महोत्सवाचे हे दुसरे वर्ष असून पहिल्या पर्वाला मिळालेल्या प्रतिसादामुळे यंदा त्याची व्याप्ती वाढविण्यात आली आहे. मराठी चित्रपटांचा वैविध्यपूर्ण आविष्कार, नामवंत कलाकारांशी संवाद आणि नव्या प्रतिभेला मिळणारे व्यासपीठ यामुळे हा महोत्सव चित्रपटप्रेमींसाठी पर्वणी ठरणार आहे. इच्छुकांनी www.chitrapataka.com या अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी करावी, असे आवाहन महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील यांनी केले आहे.


