
१०० दिवस चालणारा हा शो यंदा मात्र अवघ्या ७० दिवसांतच संपला. मात्र या ७० दिवसांतही या शोने प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केलं. यंदाच्या पर्वाने ‘बिग बॉस मराठी’च्या इतिहासातील सर्व रेकॉर्ड्स मोडले आणि नॉन-फिक्शनच्या शोमध्येही सर्वोच्च टीआरपी आणत बाजी मारली. एकूण १६ जणांच्या एन्ट्रीने सुरुवात झालेला ‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सीझन अवघ्या सहा जणांवर येऊन ठेपला. एकमेकांना टक्कर आणि चुरशीची लढत देत या सहा जणांनी शोच्या अंतिम सोहळ्यापर्यंत बाजी मारली आहे.
अंकिता प्रभू वालावलर, धनंजय पोवार, सूरज चव्हाण, अभिजीत सावंत, जान्हवी किल्लेकर आणि निक्की तांबोळी हे सहा जण ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचे अंतिम दावेदार बनले. या सहा जणांनीदेखील एकमेकांना टक्कर देत आपला इथपर्यंतचा पल्ला गाठला. अशातच नुकत्याच पार पडलेल्या महाअंतिम सोहळ्यात सर्वांच्या लाडक्या सूरज चव्हाणने बाजी मारली आणि ‘बिग बॉस मराठी ५’च्या विजेतेपदावर आपलं नाव कोरलं आहे. शोचा होस्ट रितेश देशमुखने ‘बिग बॉस मराठी ५’च्या विजेतेपदाची घोषणा करत सूरज चव्हाणचे नाव जाहीर केलं आहे. सूरजला बिग बॉसच्या ट्रॉफीसह रोख रक्कम १४ लाख ६० हजार आणि ईलेक्ट्रिक बाइकही मिळाली आहे.
गावाकडचं साधं राहणीमान आणि शैक्षणिक ज्ञान नसलेल्या सूरजला ‘बिग बॉस’च्या घरातील सुरुवातीचे काही दिवस खूपच कठीण गेले. मात्र, कालांतराने त्याला खेळ कसा खेळायचा याची समज आली. यादरम्यान, सूरजला पॅडी, अंकिता, डीपी, अभिजीत या संपूर्ण ‘बी टीम’ने सुरुवातीपासूनच खंबीर साथ दिली. त्याला वेळोवेळी खेळ समजावून सांगितला आणि या खेळात हळूहळू तरबेज होत सूरजने अंतिम सोहळ्यापर्यंत आपली मजल मारली आणि इतकंच नव्हे तर आता त्याने या शोच्या विजेतेपदावरही आपलं नाव कोरलं आहे.
‘बिग बॉस मराठी’चा महाविजेता सूरज चव्हाण ठरला असून या शोच्या उपविजेतेपदाचा बहुमान गायक अभिजीत सावंतला मिळाला आहे. तसंच सूरजच्या विजयामुळे त्याच्या असंख्य चाहत्यांना नक्कीच आनंद झाला असेल. सूरजने ‘बिग बॉस’च्या घरात एन्ट्री केल्यानंतर अनेकांनी नाकं मुरडली होती. या शोमध्ये त्याला का घेतलं गेलं? अशा अनेक प्रतिक्रिया आल्या होत्या. मात्र या शोचे विजेतेपद पटकावत अनेक नकारात्मक प्रतिक्रिया करणाऱ्यांना सूरजने सणसणीत उत्तर दिले आहे. दरम्यान, सूरजच्या या विजयावर घरातील व घराबाहेरील अनेकांनी आनंद व्यक्त केला आहे.