जालना प्रतिनिधी
मराठा आरक्षणाचा लढा अधिक संघटित आणि व्यापक करण्यासाठी मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आता नवी रणनीती आखली आहे. केवळ आंदोलन, मोर्चे आणि सभांपुरते मर्यादित न राहता मराठा समाजाची राज्यव्यापी संघटनात्मक फळी उभारण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. त्यासाठी ‘प्रत्येक घरात एक मराठा सेवक’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी पुढाकार घेतला असून, राज्यातील मराठा आणि कुणबी तरुणांसाठी विशेष संपर्क क्रमांक जाहीर केला आहे. या निर्णयामुळे मराठा समाजातील तरुणांना संघटित करण्याच्या मोहिमेला नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे.
दसरा मेळाव्यात मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या भविष्यासाठी काही महत्त्वाच्या घोषणा केल्या होत्या. त्यामध्ये प्रत्येक घरातून एक मराठा सेवक तयार करणे, कुणबी नोंदी आणि जात प्रमाणपत्रांसंदर्भातील अडचणी सोडविणे तसेच समाजातील सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी स्वतंत्र यंत्रणा उभारणे या मुद्द्यांचा समावेश होता. त्यानुसार आता मराठा सेवक म्हणून काम करण्यास इच्छुक असलेल्या तरुणांसाठी 9421292222 हा संपर्क क्रमांक जाहीर करण्यात आला आहे. या क्रमांकावर थेट फोन न करता केवळ संदेशाद्वारे आपली माहिती पाठवायची आहे.
इच्छुक तरुणांनी आपले संपूर्ण नाव, गाव, राहण्याचा पत्ता आणि सध्या कोणता व्यवसाय किंवा काम करतात, याची माहिती संदेशाद्वारे पाठवावी. या माध्यमातून राज्यभरातील समाजासाठी काम करण्याची इच्छा असलेल्या कार्यकर्त्यांची माहिती संकलित केली जाणार आहे. विशेषतः ग्रामीण भागातील तरुणांनी या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
राजकारणापेक्षा समाजकारणाला प्राधान्य!
या उपक्रमामागे केवळ कार्यकर्त्यांची संख्या वाढविणे हा उद्देश नसून समाजाच्या अडीअडचणींच्या काळात मदतीला धावून जाणारी एक विश्वासार्ह यंत्रणा उभी करणे, हा मुख्य हेतू आहे. ‘समाज प्रथम आणि राजकारण नंतर’ हे सूत्र प्रत्येक मराठा सेवकाने अंगीकारले पाहिजे, अशी भूमिका जरांगे पाटील यांनी मांडली आहे.
कोणत्याही राजकीय पक्षाचा किंवा नेत्याचा वैयक्तिक स्वार्थ न बाळगता समाजाच्या हितासाठी काम करणारे कार्यकर्ते तयार झाले पाहिजेत. समाजावर संकट आले, अन्याय झाला किंवा एखाद्या कुटुंबाला अडचणींचा सामना करावा लागला, तर मदतीसाठी तत्पर असणारी कार्यकर्त्यांची फळी राज्यभर उभी राहिली पाहिजे, अशी त्यांची अपेक्षा आहे.
सभा, आंदोलनांमध्ये सेवकांची महत्त्वाची भूमिका
राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाच्या हक्कांसाठी सभा, आंदोलने किंवा विविध उपक्रम आयोजित केले जातील. त्या ठिकाणी या सेवकांनी पुढाकार घेऊन समाजबांधवांना एकत्र आणावे, त्यांच्यामध्ये जागृती निर्माण करावी आणि संघटनात्मक ताकद वाढवावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.
दरम्यान, मराठा आरक्षणाचा प्रश्न, कुणबी नोंदी, जात प्रमाणपत्रे, वैधता प्रमाणपत्रे आणि प्रशासकीय पातळीवर येणाऱ्या अडचणी हे प्रश्न अद्याप समाजासाठी महत्त्वाचे आहेत. त्यामुळे केवळ आरक्षणाच्या आंदोलनापुरते न थांबता समाजाच्या दैनंदिन प्रश्नांवर काम करणारी यंत्रणा उभारण्याचा जरांगे पाटील यांचा प्रयत्न असल्याचे दिसत आहे.
आता मराठा समाजातील किती तरुण या आवाहनाला प्रतिसाद देतात आणि राज्याच्या प्रत्येक गावात मराठा सेवकांची फळी कितपत उभी राहते, याकडे राजकीय आणि सामाजिक वर्तुळाचे लक्ष लागले आहे.


