पुणे प्रतिनिधी
कोल्हापूरच्या सहकार क्षेत्रात गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदावरून रंगलेल्या सत्तासंघर्षानंतर आता केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्याकडे संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महायुतीने बाजी मारत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजेश पाटील यांना अध्यक्षपदी विराजमान केले. या निकालामुळे काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांना राजकीय धक्का बसला असतानाच अमित शाह १५ नोव्हेंबरला पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यानंतर १६ नोव्हेंबरला त्यांचा कोल्हापूर दौराही नियोजित आहे. त्यामुळे गोकुळमधील सत्तांतर, सहकार क्षेत्रातील बदलती समीकरणे आणि पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय रणनीती यावर शाह यांच्या दौऱ्यात चर्चा होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीने कोल्हापूरच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली. संचालक मंडळाच्या निवडणुकीत समविचारी आघाडीने १३ जागा जिंकत आघाडी घेतली होती, तर महायुतीला १२ जागांवर समाधान मानावे लागले होते. त्यामुळे गोकुळवर समविचारी आघाडीची सत्ता येणार, असे चित्र निर्माण झाले होते. मात्र, शासननियुक्त चार संचालकांना मतदानाचा अधिकार मिळाल्यानंतर संपूर्ण राजकीय गणित बदलले. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महायुतीने १६ विरुद्ध १३ मतांनी विजय मिळवत राजेश पाटील यांची अध्यक्षपदी निवड केली. या निकालाने गोकुळमधील सत्तासंघर्षाला निर्णायक वळण मिळाले.
या निवडणुकीत शासननियुक्त संचालकांच्या मतदानाच्या अधिकारावरून मोठा कायदेशीर आणि राजकीय संघर्ष पाहायला मिळाला. सहकार संस्थांमधील शासनाचा हस्तक्षेप, संचालकांचे अधिकार आणि राजकीय पक्षांची ताकद या मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. अखेर महायुतीने अध्यक्षपद मिळवल्याने कोल्हापूरच्या सहकार क्षेत्रातील राजकीय समीकरणे बदलल्याचे स्पष्ट झाले आहे.
अमित शाह यांच्या दौऱ्याला सहकाराची किनार
अमित शाह हे केंद्रीय गृहमंत्री असण्यासोबतच केंद्रीय सहकारमंत्रीही आहेत. त्यामुळे त्यांचा पश्चिम महाराष्ट्रातील दौरा केवळ राजकीय कार्यक्रमांपुरता मर्यादित न राहता सहकार क्षेत्राच्या दृष्टीनेही महत्त्वाचा मानला जात आहे. गोकुळमधील सत्तासंघर्ष, शासननियुक्त संचालकांचा मतदानाचा अधिकार, सहकारी संस्थांमधील भाजपची वाढती राजकीय ताकद आणि आगामी स्थानिक राजकारण या विषयांवर स्थानिक नेत्यांशी चर्चा होण्याची शक्यता आहे.
विशेष म्हणजे, गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महायुतीने मिळवलेल्या यशानंतर भाजप आणि मित्रपक्षांच्या नेत्यांमध्ये नव्या राजकीय आत्मविश्वासाचे वातावरण आहे. दुसरीकडे, सतेज पाटील यांच्यासाठी हा निकाल प्रतिष्ठेचा धक्का मानला जात आहे. त्यामुळे शाह यांच्या कोल्हापूर दौऱ्यात या संपूर्ण घडामोडींचे पडसाद उमटतात का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
पुण्यात तीन कार्यक्रमांना उपस्थिती
अमित शाह १५ नोव्हेंबरला पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील तीन प्रमुख कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. पुण्यातील अलका टॉकीज चौकातून पहाटे ५.३० वाजता सुरू होणाऱ्या ‘रन फॉर युनिटी’ मॅरेथॉनचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. याशिवाय भारत इतिहास संशोधक मंडळाच्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहतील. तसेच पिंपरी-चिंचवडमधील तळेगाव येथे आयोजित कार्यक्रमातही त्यांचा सहभाग असणार आहे.
१६ नोव्हेंबरच्या कोल्हापूर दौऱ्याकडे लक्ष
पुण्यातील कार्यक्रमांनंतर १६ नोव्हेंबरला शाह कोल्हापूरच्या दौऱ्यावर येणार असल्याने राजकीय वर्तुळात उत्सुकता वाढली आहे. या दौऱ्यात अधिकृत कार्यक्रमांव्यतिरिक्त स्थानिक भाजप नेत्यांसोबत स्वतंत्र बैठका होणार का, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. मात्र, गोकुळमधील सत्तासंघर्षानंतर शाह यांचा कोल्हापूर दौरा होत असल्याने त्याला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.
गोकुळच्या सत्तेचा तिढा सुटला असला, तरी सहकार क्षेत्रातील राजकीय संघर्ष संपलेला नाही. उलट, या निकालानंतर पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय समीकरणांना नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे अमित शाह यांच्या कोल्हापूर दौऱ्यात नेमकी कोणती राजकीय आणि सहकारविषयक रणनीती आखली जाते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.


