वृत्तसंस्था
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांना लक्ष्य करत पुन्हा एकदा हल्ला केला आहे. दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात बुधवारी दुपारी मोटारसायकलवरून आलेल्या दोन दहशतवाद्यांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (CRPF) नाका पथकावर अचानक गोळीबार केला. या हल्ल्यात तीन जवान जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्ल्यानंतर दोन्ही दहशतवादी घटनास्थळावरून पसार झाले असून त्यांच्या शोधासाठी सुरक्षा दलांनी मोठी मोहीम हाती घेतली आहे.
#WATCH | Jammu and Kashmir: Three CRPF personnel were injured after unidentified motorcycle-borne assailants opened fire on security personnel deployed at a naka in Kulgam.
(Visuals from the area, deferred by unspecified time; no live operational details disclosed) pic.twitter.com/lORjHoaCvg
— ANI (@ANI) November 11, 2026
कुलगाम जिल्ह्यातील आखरन-नौपुरा परिसरात CRPFच्या ४६व्या बटालियनचे जवान बुधवारी दुपारी नाकाबंदी करून वाहनांची आणि नागरिकांची तपासणी करत होते. दुपारी साधारण सव्वादोन वाजण्याच्या सुमारास मोटारसायकलवरून दोन तरुण नाक्याजवळ आले. त्यांनी कोणताही इशारा न देता जवानांच्या दिशेने गोळीबार सुरू केला.
अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात एकच धावपळ उडाली. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. गोळीबारात नाका पथकातील तीन जवान जखमी होऊन जमिनीवर कोसळले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन इतर जवानांनी तातडीने मोर्चा सांभाळत हल्लेखोरांना प्रत्युत्तर दिले.
मात्र, घटनास्थळी नागरिकांची गर्दी आणि त्यांच्या सुरक्षेचा विचार करून जवानांनी गोळीबार करताना संयम राखला. याच परिस्थितीचा फायदा घेत दोन्ही हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला.
तीन जवानांना वेगवेगळ्या ठिकाणी गोळ्या
हल्ल्यात जखमी झालेल्या जवानांची नावे हेड कॉन्स्टेबल सोमवीर, कॉन्स्टेबल शांतनू आणि कॉन्स्टेबल राकेश दास अशी आहेत. मिळालेल्या वैद्यकीय माहितीनुसार, एका जवानाच्या पायाला, दुसऱ्या जवानाच्या हाताला, तर तिसऱ्या जवानाच्या पाठीत गोळी लागली आहे.
हल्ल्याची माहिती मिळताच जवळच्या सुरक्षा छावण्यांमधून अतिरिक्त जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिसराला वेढा घालत नाकाबंदी केली. जखमी जवानांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
CCTV फुटेजच्या आधारे हल्लेखोरांचा शोध
दोन दहशतवादी पसार झाल्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी संपूर्ण परिसरात शोधमोहीम सुरू केली आहे. संशयास्पद ठिकाणांची तपासणी करण्याबरोबरच घटनास्थळाच्या आसपास असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेजही तपासले जात आहे.
हल्लेखोर नेमके कोणत्या दिशेने पळून गेले, तसेच त्यांना स्थानिक पातळीवर कोणाची मदत मिळाली होती का, याचा तपास सुरक्षा यंत्रणांकडून केला जात आहे. CRPF, जम्मू-काश्मीर पोलीस आणि लष्कराचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.


