स्वप्नील गाडे, गुन्हे वार्ताहर
मुंबई : कुर्ला पश्चिमेकडील मकडवाला कंपाऊंड परिसरात बुधवारी (११ नोव्हेंबर) भरदिवसा गोळीबाराची घटना घडली. जुन्या वैमनस्यातून ४० वर्षीय विनोद मल्लिप्पा पवार यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या हल्ल्यात विनोद पवार गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी सुमारे १२ वाजून ४० मिनिटांच्या सुमारास कुर्ला पश्चिमेकडील मकडवाला कंपाऊंड येथे हा प्रकार घडला. जुन्या वादातून विनोद पवार यांना लक्ष्य करण्यात आल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे. भरदिवसा गोळीबार झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
गोळीबारात जखमी झालेल्या विनोद पवार यांच्या शरीराला गोळ्या लागल्याने ते रक्तबंबाळ झाले होते. स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून प्रकृती गंभीर असल्याचे समजते.
घटनेची माहिती मिळताच व्ही. बी. नगर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तपासाला वेग दिला आहे. व्ही. बी. नगर पोलीस आणि गुन्हे शाखेच्या पथकांकडून या प्रकरणाचा समांतर तपास सुरू करण्यात आला आहे.
अप्पर पोलीस आयुक्त धनंजय कुलकर्णी आणि पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विविध पथके तयार करण्यात आली आहेत. गोळीबारामागील नेमके कारण, हल्ल्यात सहभागी असलेले आरोपी आणि जुन्या वादाची पार्श्वभूमी याबाबत पोलीस तपास करत आहेत. अद्याप आरोपींचा शोध सुरू असून या घटनेमुळे कुर्ला परिसरात चिंतेचे वातावरण आहे.


