मुंबई प्रतिनिधी
मुंबई : मुंबई महापालिकेच्या वैद्यकीय गटविमा योजनेमुळे आतापर्यंत ४० हजार ३३० अधिकारी, कर्मचारी आणि कामगारांना रुग्णालयीन उपचारांसाठी आर्थिक मदत मिळाली आहे. ऑक्टोबर २०२४ पासून आतापर्यंत या योजनेअंतर्गत तब्बल २७० कोटी रुपयांची मदत करण्यात आली आहे. उपचार घेतलेल्या रुग्णालयात थेट विम्याची रक्कम जमा केली जात असून, ज्या कर्मचाऱ्यांनी उपचारांचा खर्च स्वतः केला आहे, त्यांच्या बँक खात्यातही परताव्याची रक्कम जमा केली जात आहे.
मुंबई महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी आणि कामगारांसाठी २०१५-१६ आणि २०१६-१७ या आर्थिक वर्षांत वैद्यकीय गटविमा योजना सुरू होती. मात्र, तिसऱ्या वर्षासाठी म्हणजेच २०१७-१८ मध्ये या योजनेची जबाबदारी देण्यात आलेल्या युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीने अधिक रकमेची मागणी केली. यासंदर्भात पालिका प्रशासन आणि विमा कंपनीमध्ये चर्चा झाली. मात्र, कंपनीची आर्थिक मागणी पूर्ण करण्याबाबत पालिका प्रशासन सकारात्मक नसल्याचे लक्षात आल्यानंतर कंपनीने तिसऱ्या वर्षी योजना सुरू ठेवण्यास नकार दिला. परिणामी, वैद्यकीय गटविमा योजना बंद करण्यात आली.
योजना बंद झाल्याचा मोठा फटका पालिका कर्मचाऱ्यांना बसला. विशेषतः कोरोना काळात उपचारांसाठी कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागल्याचे कामगार संघटनांकडून सांगण्यात आले. त्यामुळे ही योजना पुन्हा सुरू करण्याची मागणी कर्मचारी संघटनांनी सातत्याने लावून धरली होती. अखेर कर्मचारी संघटनांच्या मागणीला यश आले आणि ऑक्टोबर २०२४ पासून वैद्यकीय गटविमा योजना पुन्हा सुरू करण्यात आली.
या योजनेचा लाभ पालिका सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबातील पात्र सदस्यांनाही मिळत आहे. यामध्ये कर्मचाऱ्याची पत्नी, मुले, आई-वडील किंवा सासू-सासरे यांचा समावेश आहे. मात्र, आई-वडील आणि सासू-सासरे या दोन्ही गटांपैकी एका गटालाच योजनेचा लाभ घेता येणार आहे.
गटविमा योजना बंद असताना उपचारांचा खर्च परत मिळेल, या अपेक्षेने अनेक कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या खिशातून लाखो रुपये खर्च केले होते. काही कर्मचाऱ्यांनी तर व्याजाने पैसे घेऊन रुग्णालयांचा खर्च भागवला होता. विमा योजना बंद असल्याने अशा कर्मचाऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. आता योजना पुन्हा सुरू झाल्यामुळे महापालिकेतील ९० हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
पालिकेच्या वैद्यकीय गटविमा योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांना उपचारांसाठी मदत दिली जात असून, ऑक्टोबर २०२४ पासून आतापर्यंत ४० हजार ३३० कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष लाभ झाला आहे. या कालावधीत २७० कोटी रुपयांची वैद्यकीय मदत वितरित करण्यात आली आहे. तसेच संबंधित विमा कंपनीला पालिका प्रशासनाकडून एकूण ३३८ कोटी रुपये अदा करण्यात आल्याची माहितीही प्रशासनाने दिली आहे.


