स्वप्नील गाडे, गुन्हे वार्ताहर
मुंबईत अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधात मालवणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी तब्बल ८००.९० ग्रॅम हेरॉईन जप्त केले असून, आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत २ कोटी ४० लाख ३० हजार रुपये आहे. या प्रकरणात चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात आले आहेत. मुंबईसह आसपासच्या जिल्ह्यांमध्ये हेरॉईन विक्रीचे जाळे कार्यरत असल्याची माहिती तपासातून समोर आली आहे.
या प्रकरणाची सुरुवात १४ ऑगस्ट २०२६ रोजी झाली. मालवणी पोलिसांनी त्यावेळी ३४ वर्षीय एका व्यक्तीला ४.९० ग्रॅम हेरॉईनसह पकडले होते. हा अंमली पदार्थ विक्रीसाठी जवळ बाळगल्याचा संशय असल्याने पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला.
तपासादरम्यान या आरोपीच्या १९ वर्षीय साथीदाराचा शोध लागला. त्याच्याकडे पोलिसांना २६३ ग्रॅम हेरॉईन मिळाले. त्यानंतर त्यालाही अटक करण्यात आली. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत मुंबई आणि आसपासच्या जिल्ह्यांमध्ये परराज्यातील काही व्यक्ती हेरॉईनची विक्री करत असल्याची माहिती मिळाली. तसेच त्यांचे दोन साथीदार जुहू परिसरात ड्रग्ज विक्री करत असल्याचे समोर आले.
या माहितीच्या आधारे मालवणी पोलिसांनी जुहू येथे कारवाई केली. यावेळी २५ आणि २० वर्षांच्या दोन तरुणांना ५३३ ग्रॅम हेरॉईनसह ताब्यात घेण्यात आले. या हेरॉईनची किंमत १ कोटी ५९ लाख ९० हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले.
अशा प्रकारे पोलिसांनी तीन टप्प्यांतील कारवाईत एकूण ८००.९० ग्रॅम हेरॉईन जप्त केले. त्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत २ कोटी ४० लाख ३० हजार रुपये आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी परराज्यातील असल्याची माहिती समोर आली असून, त्यांचा शोध घेण्यासह संपूर्ण ड्रग्ज पुरवठा साखळीचा तपास सुरू आहे. पोलीस उपनिरीक्षक प्रदीप लोंढे पुढील तपास करीत आहेत.
ही कारवाई पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस सहआयुक्त डॉ. मनोजकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त शशिकुमार मीना, पोलीस उपआयुक्त संदीप घुगे, सहाय्यक पोलीस आयुक्त महेशकुमार ठाकूर आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक राणी पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक मिना मरे, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप लोंढे, पोलीस शिपाई साजिद शेख, मुद्दस्सर देसाई, कालिदास खुडे आणि तांत्रिक मदत करणारे आदित्य राणे सहभागी होते.


