नवी दिल्ली वृत्तसंस्था
नवी दिल्ली : देशात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण अर्थात एसआयआर (SIR) प्रक्रियेवरून राजकीय वातावरण तापलेले असतानाच केंद्रीय निवडणूक आयोगाने आणखी सहा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये विशेष संक्षिप्त पुनर्विलोकन (SSR) प्रक्रिया राबविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार १ जानेवारी २०२७ ही पात्रता तारीख निश्चित करण्यात आली असून, संबंधित राज्यांमधील अंतिम मतदार यादी २१ जानेवारी २०२७ रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्यांच्या अद्ययावतीकरणाला वेग येणार आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी आणि एसआयआर प्रक्रियेविरोधात विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतलेली असतानाच निवडणूक आयोगाने हा निर्णय जाहीर केला आहे. आयोगाच्या आदेशानुसार अरुणाचल प्रदेश, चंदीगड, दादरा आणि नगर हवेली व दमण आणि दीव, मिझोराम, ओडिशा आणि सिक्कीम या सहा राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये ही प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
१८ वर्षे पूर्ण करणाऱ्या तरुणांना मतदार होण्याची संधी
या विशेष संक्षिप्त पुनर्विलोकन प्रक्रियेचा सर्वाधिक फायदा नवमतदारांना होणार आहे. १ जानेवारी २०२७ पर्यंत वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या तरुणांना मतदार यादीत नाव नोंदविता येणार आहे. विशेष म्हणजे, १ एप्रिल, १ जुलै आणि १ ऑक्टोबर २०२७ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या तरुणांनाही आगाऊ अर्ज दाखल करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे नव्या मतदारांना मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी अधिक संधी मिळणार आहे.
दरम्यान, ज्या राज्यांमध्ये विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) प्रक्रिया सुरू आहे किंवा पूर्ण झाली आहे, त्या राज्यांसाठी एसएसआरचे वेळापत्रक स्वतंत्रपणे जाहीर केले जाणार असल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. यामध्ये आंध्र प्रदेश, हरियाणा, झारखंड, कर्नाटक, महाराष्ट्र, मेघालय, नागालँड, दिल्ली, त्रिपुरा आणि तेलंगणा या राज्यांचा समावेश आहे. तर हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर आणि लडाखमधील हवामानाची परिस्थिती लक्षात घेऊन तेथील एसएसआर प्रक्रियेच्या तारखा नंतर निश्चित केल्या जाणार आहेत.
असे असेल एसएसआरचे वेळापत्रक
निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, २० नोव्हेंबर २०२६ पर्यंत मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण पूर्ण केले जाणार आहे. त्यानंतर ३० नोव्हेंबर २०२६ रोजी एकात्मिक मसुदा मतदार यादी प्रसिद्ध होईल. या मसुदा यादीवर ३० नोव्हेंबर ते ३० डिसेंबर २०२६ या कालावधीत नागरिकांना दावे आणि आक्षेप नोंदविता येणार आहेत. त्यानंतर सर्व हरकतींची पडताळणी करून २१ जानेवारी २०२७ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.
अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरही आयोगाचे निर्बंध
एसएसआर प्रक्रिया पारदर्शक आणि निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी निवडणूक आयोगाने प्रशासकीय यंत्रणेला कडक सूचना दिल्या आहेत. लोकप्रतिनिधित्व कायदा १९५० मधील कलम १३सीसीनुसार मतदार यादी तयार करण्याच्या कामात सहभागी असलेल्या अधिकाऱ्यांना या कालावधीत निवडणूक आयोगाच्या प्रतिनियुक्तीवर असल्याचे मानले जाणार आहे. मुख्य सचिवांनी मुख्य निवडणूक अधिकारी (CEO), जिल्हा निवडणूक अधिकारी (DEO), मतदार नोंदणी अधिकारी (ERO) आणि गटविकास अधिकारी यांची पदे रिक्त राहणार नाहीत, याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
विशेष म्हणजे, एसएसआर प्रक्रिया सुरू असताना निवडणूक आयोगाच्या पूर्वपरवानगीशिवाय संबंधित अधिकाऱ्यांच्या बदल्या करता येणार नाहीत. तसेच कोणत्याही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीतून वगळले जाणार नाही आणि अपात्र व्यक्तीचे नाव यादीत समाविष्ट होणार नाही, याची संपूर्ण जबाबदारी मतदार नोंदणी अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे.
एकूणच, देशातील मतदार याद्या अधिक अचूक आणि अद्ययावत करण्यासाठी निवडणूक आयोगाने एसएसआर प्रक्रियेचा विस्तार केला आहे. मात्र, एकीकडे एसआयआरवरून राजकीय संघर्ष सुरू असताना या नव्या प्रक्रियेकडे राजकीय पक्षांसह मतदारांचेही लक्ष लागले आहे.


