मुंबई प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या निवडणुकीसंदर्भात काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज (बंटी) पाटील उद्या, गुरुवार, ५ नोव्हेंबर रोजी मुंबईत महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद घेणार आहेत.
मुंबईतील कुलाबा परिसरातील गांधी भवन, तन्ना हाऊस येथे दुपारी १२ वाजता ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसंदर्भात सतेज पाटील या पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडणार आहेत. विशेषतः गोकुळमध्ये शासननियुक्त संचालकांची नियुक्ती आणि त्यांना मतदानाचा अधिकार देण्याच्या राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
गोकुळच्या सत्तासंघर्षात शासनाच्या निर्णयामुळे निर्माण झालेल्या नव्या राजकीय समीकरणांवर सतेज पाटील काय भाष्य करतात, तसेच आगामी अध्यक्षपदाच्या निवडणुकीसंदर्भात कोणती भूमिका स्पष्ट करतात, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
पत्रकार परिषदेचा तपशील :
दिनांक : गुरुवार, ५ नोव्हेंबर २०२६
वेळ : दुपारी १२ वाजता
स्थळ : गांधी भवन, पहिला मजला, तन्ना हाऊस, रिगल सिनेमाजवळ, कुलाबा, मुंबई.


