पुणे प्रतिनिधी
दिवाळीला माहेरहून सोनं आणण्याचा तगादा, हुंडा आणि दागिन्यांच्या मागणीसाठी कथित मानसिक व शारीरिक छळ… या त्रासाला कंटाळून पुण्यातील एका २९ वर्षीय आयटी इंजिनिअर विवाहितेने जीवन संपवल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मुकुंदनगर परिसरातील अक्षय हाइट्स सोसायटीत पायल अक्षय झांबरे यांचा मृतदेह घरातील छताच्या पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर मृत महिलेच्या माहेरच्या कुटुंबीयांनी सासरच्या मंडळींवर हुंडा आणि सोन्याच्या मागणीसाठी छळ केल्याचा गंभीर आरोप केला आहे.
सोमवारी मुकुंदनगर येथील अक्षय हाइट्स सोसायटीतील जुन्या फ्लॅटमध्ये ही घटना उघडकीस आली. पायल या एका आयटी कंपनीत कार्यरत होत्या. सुमारे पाच वर्षांपूर्वी त्यांचा अक्षय झांबरे यांच्याशी विवाह झाला होता. या दाम्पत्याला चार वर्षांची मुलगी आहे. संसार सुरू असतानाच सासरच्या मंडळींकडून पैशांसह सोन्याच्या दागिन्यांची मागणी केली जात असल्याचा आरोप माहेरच्या नातेवाइकांनी केला आहे.
दरवर्षी ५ ते १० तोळे सोन्याची मागणी?
पायल यांचे चुलत भाऊ जनार्दन पवार यांनी या प्रकरणात गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, दिवाळीच्या सणाच्या काळात दरवर्षी माहेरून ५ ते १० तोळे सोन्याची मागणी केली जात होती. यंदाही अशीच मागणी करण्यात आली होती. मात्र, माहेरच्या कुटुंबीयांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन त्यांनी ही मागणी पूर्ण करण्यास असमर्थता दर्शवली आणि पुढील वर्षापर्यंत थांबण्याची विनंती केली होती.
त्यानंतर पायल यांच्यावर सासरच्या मंडळींकडून दबाव टाकण्यात आला. सोन्याच्या मागणीवरून त्यांचा मानसिक आणि शारीरिक छळ सुरूच होता, असा आरोप जनार्दन पवार यांनी केला आहे. या कथित छळामुळेच पायल यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचा संशय माहेरच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे.
सीसीटीव्ही फुटेज आणि फॉरेन्सिक तपासणी सुरू
घटनेची माहिती मिळताच स्वारगेट पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पायल यांचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. घटनास्थळी फॉरेन्सिक पथकाने पंचनामा केला असून, इमारतीतील सीसीटीव्ही फुटेजचीही तपासणी सुरू करण्यात आली आहे.
दरम्यान, पायल यांचा मृत्यू नेमका कोणत्या परिस्थितीत झाला, याबाबत माहेरच्या कुटुंबीयांनी संशय व्यक्त केला आहे. केवळ आत्महत्येचा निष्कर्ष न काढता मृत्यूमागील सर्व परिस्थिती, कथित हुंड्याची मागणी आणि छळाच्या आरोपांची सखोल चौकशी करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
एका चार वर्षांच्या चिमुरडीच्या डोक्यावरील आईचे छत्र हरपल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. हुंडा आणि सोन्याच्या मागणीसाठी विवाहित महिलांचा छळ होत असल्याच्या घटनांमुळे पुन्हा एकदा सामाजिक प्रश्न ऐरणीवर आला आहे. स्वारगेट पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत असून, तपासातून मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.


