ठाणे प्रतिनिधी
ठाणे : प्रदीप पूर्णेकर यांना न्याय मिळावा, हत्येच्या प्रकरणातील सूत्रधारांना अटक करावी, एकनाथ शिंदे यांनी राजीनामा द्यावा आणि ठाणे भयमुक्त करावे, या मागण्यांसाठी गुरुवारी शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ठाण्यात सर्वपक्षीय महाआंदोलन होणार आहे. जांभळी नाका येथील चिंतामणी चौकात सायंकाळी पाच वाजता आंदोलन होणार असून खासदार संजय राऊतही उपस्थित राहणार आहेत.
ठाणे शहरात ड्रग्ज माफिया आणि गुन्हेगारीचा वाढता प्रभाव असल्याचा मुद्दा उपस्थित करत शहर भयमुक्त करण्याची मागणी या आंदोलनातून केली जाणार आहे. आदित्य ठाकरे पूर्णेकर कुटुंबीयांशी चर्चा करणार असून त्यानंतर ठाण्याच्या पोलीस आयुक्तांची भेट घेऊन या प्रकरणात न्याय मिळवून देण्याची मागणी करणार आहेत.
विशेष तपास पथकाने मीनाक्षी शिंदे यांची सुमारे सात तास चौकशी केली. रात्री आठच्या सुमारास त्यांना सोडण्यात आले. चौकशीमध्ये पूर्णेकर यांच्याशी असलेले वैमनस्य, हत्येच्या दिवशीचे लोकेशन, घटनेची पूर्वकल्पना होती का आणि या प्रकरणातील आरोपींशी त्यांची ओळख कधीपासून व कशी आहे, याबाबत प्रश्न विचारण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
प्रदीप पूर्णेकर यांचा मुलगा राम याने आंदोलनाची परवानगी घेतल्यानंतरही पोलिसांनी त्याला रोखल्याने संताप व्यक्त केला. “माझे वडील गेलेत हो सर… मला न्याय हवा आहे… तुम्ही चुकीचे करताय,” असा आक्रोश त्याने केला. मात्र, पोलिसांनी त्याचे म्हणणे ऐकले नाही. त्याला जबरदस्तीने रिक्षात बसवून नौपाडा पोलीस ठाण्यात नेण्यात आले. एकनाथ शिंदे यांच्या घराबाहेर आंदोलन करण्याचा इशारा पूर्णेकर कुटुंबीयांनी दिल्यानंतर सोमवारपासून त्यांच्या निवासस्थानाजवळ पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.


