मुंबई प्रतिनिधी
मुंबई : जुन्या डम्पिंग ग्राउंडमधून बाहेर पडणारा मिथेन वायू, वाहनांची वाढती वर्दळ आणि दगडखाणींमधून पसरणारी धूळ यामुळे मुंबईतील वायुप्रदूषणात भर पडत आहे. या पार्श्वभूमीवर माहुल, गोवंडी, शिवाजीनगर, मानखुर्द आणि बीकेसी या प्रदूषणाच्या दृष्टीने संवेदनशील भागांवर महापालिका प्रशासन विशेष लक्ष केंद्रित करणार आहे. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अविनाश ढाकणे यांनी ही माहिती दिली.
जुन्या डम्पिंग ग्राउंडमधून बाहेर पडणाऱ्या मिथेन वायूचा आसपासच्या परिसरावर परिणाम होत असल्याचे ढाकणे यांनी स्पष्ट केले. प्रदूषण कमी करण्यासाठी ओल्या आणि सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण तसेच कचऱ्यापासून वीजनिर्मिती करण्याच्या उपाययोजना राबवण्यात येत आहेत. पुढील दोन ते तीन महिन्यांत वीजनिर्मिती सुरू होण्याची अपेक्षा असल्याचेही त्यांनी सांगितले.
मुंबईचा हवा गुणवत्ता निर्देशांक १०० च्या खाली ठेवण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजनांची गरज आहे, तर तो १५० च्या खाली राखण्यासाठी अल्पकालीन उपायांवर भर दिला जात आहे. रस्त्यांवरील धूळ नियंत्रणासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांच्या कामकाजावर देखरेख ठेवणे आणि बांधकामांमधून निर्माण होणारी धूळ रोखणे आवश्यक असल्याचे ढाकणे यांनी नमूद केले. नवी मुंबईच्या दिशेने असलेल्या दगडखाणी आणि वाहनांची वर्दळ यांचाही प्रदूषणावर परिणाम होत आहे. प्रदूषण नियंत्रणासाठी नगरसेवकांनी आवश्यक सूचना द्याव्यात, असे आवाहनही त्यांनी केले.


