बारामती प्रतिनिधी
बारामती : मंत्र्यांप्रमाणे पोलीस संरक्षण, एस्कॉर्ट गाड्या आणि वाहनांचा ताफा मिळवण्याच्या हव्यासातून बारामतीतील उद्योजक राणा सूर्यवंशी यांनी स्वतःवरील हल्ल्याचा कट रचल्याचे पुणे ग्रामीण पोलिसांच्या तपासात उघड झाल्याची माहिती समोर आली आहे. या कथित बनावट हल्ल्याच्या प्रकरणामुळे बारामतीसह पुणे जिल्ह्यात चर्चेला उधाण आले आहे.
‘राणा शिपिंग’चे मालक राणा सूर्यवंशी यांच्यावर १८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास बारामती विमानतळाजवळील गोजुबावी शिवारात हल्ला झाल्याची घटना घडली होती. दुचाकीवरून आलेल्या दोघांनी आपण त्यांचे चाहते असल्याचे सांगत पुष्पगुच्छ देण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी शस्त्राने त्यांच्या उजव्या हातावर वार करण्यात आल्याचे सांगण्यात आले. जखमी सूर्यवंशी यांना बारामतीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
व्हीआयपी सुरक्षेसाठी हल्ल्याचा बनाव केल्याचा संशय
पोलिसांच्या तपासानुसार, सूर्यवंशी यांनी यापूर्वी पैसे भरून पोलीस संरक्षण घेतले होते. मात्र, त्यांना मंत्र्यांप्रमाणे एस्कॉर्ट गाड्यांसह विशेष सुरक्षा हवी होती. अशा सुरक्षेसाठी संबंधित व्यक्तीला असलेला संभाव्य धोका विचारात घेतला जात असल्याने, स्वतःला धोका असल्याचे भासवण्यासाठी हल्ल्याचा कट रचल्याचे तपासात उघड झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी बारामती पोलीस ठाण्यात राणा सूर्यवंशी यांचे चालक लक्ष्मीकांत महादेव सूर्यवंशी (वय ४२, रा. सणसर, ता. इंदापूर) यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी पार्थ अवथडे आणि स्वप्नील कांबळे या दोघांना यापूर्वीच अटक केली असून, एका अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेतले आहे. शुक्रवारी या प्रकरणात तिसऱ्या आरोपीला अटक करण्यात आली. आता या प्रकरणात उद्योजक राणा सूर्यवंशी यांच्यावर पोलीस कोणती कारवाई करतात, याकडे लक्ष लागले आहे.


