मुंबई प्रतिनिधी
मुंबई : मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत एका दिवसात नमुना ७ चे २४ अर्ज दाखल केल्याप्रकरणी धारावी पोलिस ठाण्यात गिरिधारी जयस्वाल यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धारावी विधानसभा मतदारसंघात हा प्रकार उघडकीस आल्याची माहिती महापालिकेच्या जनसंपर्क विभागाने दिली.
निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार बृहन्मुंबई क्षेत्रात मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण सुरू आहे. प्रारूप मतदार यादीवर दावे आणि हरकती नोंदवण्यासाठी नमुना ७ चा अर्ज वापरला जातो. धारावी पूर्वेतील गंगाधरलाल चाळ, ९० फूट मार्ग परिसरात राहणारे गिरिधारी जयस्वाल यांनी एकाच दिवशी २४ अर्ज दाखल केल्याचे निदर्शनास आले. निवडणूक आयोग आणि राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार, एका व्यक्तीला दिवसाला जास्तीत जास्त १० अर्ज दाखल करण्याची मर्यादा आहे. या नियमाचे उल्लंघन केल्याने त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली.
नमुना ७ मध्ये जाणूनबुजून खोटी किंवा चुकीची माहिती दिल्यास लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५० च्या कलम ३१ अन्वये कारवाई करण्याची तरतूद आहे. त्यानुसार जयस्वाल यांच्याविरोधात धारावी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
दरम्यान, सर्व विधानसभा मतदारसंघांच्या प्रारूप मतदार याद्या ३१ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. दावे आणि हरकती दाखल करण्याची अंतिम मुदत २६ ऑक्टोबर २०२६ असून, नागरिकांनी मतदार यादीतील आपले नाव तपासून आवश्यक असल्यास मुदतीत अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.


