मुंबई प्रतिनिधी
मुंबई : चार्टर्ड अकाउंटन्सीच्या (सीए) क्षेत्रात महाराष्ट्रातील दोन विद्यार्थ्यांनी देशपातळीवर उल्लेखनीय यश मिळवले आहे. सीए इंटरमिजिएटच्या सप्टेंबर २०२६ परीक्षेत नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीची साक्षी चांडक आणि मुंबईचा नील राजेश शाह यांनी प्रत्येकी ६०० पैकी ५०२ गुण मिळवत देशात संयुक्तपणे प्रथम क्रमांक पटकावला. दोघांनीही ८३.६७ टक्के गुण मिळवले असून त्यांच्या यशामुळे महाराष्ट्राच्या शैक्षणिक गुणवत्तेची देशभरात चर्चा होत आहे.
साक्षीने शालेय जीवनापासूनच गुणवत्तेचा ठसा उमटवला आहे. दहावीच्या सीबीएसई परीक्षेत तिने ९७.४ टक्के गुण मिळवत शाळेत प्रथम क्रमांक मिळवला, तर बारावीच्या महाराष्ट्र बोर्डाच्या परीक्षेत ९४.३३ टक्के गुणांसह नाशिकमध्ये चौथा क्रमांक पटकावला. सध्या ती पुणे विद्यापीठातून बीकॉमचे शिक्षण घेत असून सीएची तयारीही करत आहे. वित्त, गणित आणि कर आकारणी या विषयांमध्ये तिला विशेष रुची आहे.
साक्षीने जुलै २०२५ पासून सीए इंटरमिजिएट परीक्षेची तयारी सुरू केली. ती पहाटे पाच वाजता उठून रात्री साडेदहा वाजता झोपत असे. दररोज सरासरी १२ तास अभ्यास करणाऱ्या साक्षीने परीक्षा जवळ आल्यानंतर अभ्यासाचा कालावधी १४ तासांपर्यंत वाढवला. प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र अभ्यासपद्धती स्वीकारताना तिने स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंटची वारंवार उजळणी केली. ऑडिट विषयाचा चार वेळा सरावपूर्वक अभ्यास केला, तर टॅक्स विषयासाठी सुरुवातीपासूनच विशेष मेहनत घेतली.
परीक्षेपूर्वी तिला तणाव आणि आत्मविश्वासाच्या कमतरतेचा सामना करावा लागला. मात्र, आई-वडील आणि शिक्षकांच्या पाठिंब्यामुळे तिने या परिस्थितीवर मात केली. अभ्यासातील काही संकल्पना स्पष्ट करून घेण्यासाठी आणि कायदेशीर प्रकरणे समजून घेण्यासाठी तिने कृत्रिम बुद्धिमत्तेची (AI) मदतही घेतली. चित्रकला, सुडोकू आणि निसर्गभ्रमंती हे तिचे आवडते छंद आहेत. देशात प्रथम क्रमांक मिळाल्याचे समजल्यानंतर अनेक महिन्यांच्या मेहनतीचे सार्थक झाल्याने ती भावूक झाली. पुढे बीकॉम आणि सीएचे शिक्षण पूर्ण करण्याचे तिचे ध्येय आहे.
सातत्यपूर्ण अभ्यास, योग्य नियोजन आणि कुटुंबीयांचा पाठिंबा हेच यशाचे गमक असल्याचे साक्षीच्या प्रवासातून स्पष्ट होते. नाशिकच्या साक्षीसह मुंबईच्या नीलनेही देशात संयुक्तपणे अव्वल स्थान मिळवल्याने महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी ही कामगिरी प्रेरणादायी ठरली आहे.


