पुणे प्रतिनिधी
पुणे : चार-सहा महिने शेतात मेहनत करून झेंडूची फुले पिकवली, निसर्गाच्या बदलत्या परिस्थितीशी सामना केला; मात्र दसऱ्याच्या बाजारात अपेक्षित भाव न मिळाल्याने सासवड आणि जेजुरी परिसरातील झेंडू उत्पादक शेतकऱ्यांची निराशा झाली आहे. फुले विकूनही खर्चाएवढे पैसे मिळत नसल्याने अनेक शेतकऱ्यांना रिकाम्या हाताने घरी परतावे लागले. दसऱ्यासाठी घेतलेल्या मेहनतीचे पैसे मिळाले नसल्याने आता दिवाळीचा सण कसा साजरा करायचा, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे.
पावसाची कमतरता आणि वाढत्या उष्णतेचा झेंडूच्या पिकावर परिणाम झाला. फुलांचा आकार आणि प्रतवारी कमी झाल्याने शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागला. त्यातच बाजारात मोठ्या प्रमाणावर फुलांची आवक झाल्याने दर घसरले. सणासुदीच्या काळात चांगला भाव मिळेल, या अपेक्षेने फुले बाजारात आणलेल्या शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग झाला. झेंडूच्या लागवडीपासून मजुरी आणि वाहतुकीपर्यंत झालेला खर्च पाहता मिळणारे पैसे परवडणारे नसल्याची खंत उत्पादकांनी व्यक्त केली.
पुण्यातील गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज बाजार आवारात रविवारी ८० ते ९० टन झेंडूची आवक झाली, तर सोमवारी हा आकडा १०० ते १२० टनांपर्यंत पोहोचला. पुण्यासह सोलापूर, बीड, सातारा आणि धाराशिव जिल्ह्यांतील शेतकरी फुले विक्रीसाठी घेऊन आले होते. मात्र, बाजारात फुलांचा मोठा साठा आल्याने अपेक्षित दर मिळू शकला नाही. अनेक महिने पीक सांभाळून आणि उत्पादनासाठी खर्च करूनही हातात पुरेसे पैसे पडले नसल्याने शेतकऱ्यांच्या सणाच्या आनंदावर विरजण पडले.
शेतकऱ्यांनी सरकारी यंत्रणांच्या कामकाजाबाबतही नाराजी व्यक्त केली. आमदार, मंत्री आणि शासकीय अधिकारी शेतातील नुकसानीची पाहणी करण्यासाठी येतात; मात्र प्रत्यक्ष मदत मिळत नसल्याचा अनुभव असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या दहा ते बारा वर्षांपासून अशीच परिस्थिती असल्याचेही काही शेतकऱ्यांनी नमूद केले. शासनाकडून घोषणा केल्या जातात; मात्र प्रत्यक्ष मदत मिळण्याच्या वेळी काहीच होत नसल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. केवळ पाहणी आणि आश्वासनांपुरते न थांबता शेतकऱ्यांना प्रत्यक्ष आर्थिक मदत कधी मिळणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
फुलांना योग्य भाव न मिळाल्याचा परिणाम शेतकऱ्यांच्या घरगुती खर्चावरही झाला आहे. मुलाबाळांसाठी कपडे खरेदी करणेही शक्य झाले नसल्याची व्यथा त्यांनी मांडली. नैसर्गिक संकटांचा सामना करून पीक उभे करायचे, त्यासाठी स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करायचे आणि सणासुदीच्या काळात बाजारात योग्य भाव न मिळाल्याने निराश होऊन घरी परतायचे, ही परिस्थिती आणखी किती दिवस सहन करायची, असा प्रश्न झेंडू उत्पादक शेतकरी विचारत आहेत.


