पुणे प्रतिनिधी
पुणे : अभिजीत दीपक यांच्या ‘कॉक्रोच जनता पार्टी’ला (सीजेपी) अमेरिकन गुंतवणूकदार जॉर्ज सोरोस यांच्याकडून परदेशी निधी मिळत असल्याचा आरोप भाजपच्या काही नेत्यांनी केला आहे. या आरोपांवर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारला चौकशी करण्याचे आव्हान दिले. परदेशी निधीच्या नियमनासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाचा ‘एफसीआरए’ विभाग कार्यरत असताना केवळ आरोप करण्यापेक्षा या विभागामार्फत तपास करावा, असे त्या म्हणाल्या.
विधान परिषदेच्या पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचाराचे नियोजन करण्यासाठी शनिवारी निसर्ग मंगल कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना सुळे यांनी सीजेपीला परदेशातून निधी मिळत असल्याच्या आरोपावर भूमिका स्पष्ट केली. केंद्रात भाजपचे सरकार असल्याने त्यांनी एफसीआरएकडून चौकशी करून घ्यावी, असे त्यांनी सांगितले.
सीजेपीच्या आंदोलनाला पुण्यात पोलिसांची परवानगी मिळते; मात्र दिल्लीत परवानगी मिळत नसल्याचा मुद्दाही सुळे यांनी उपस्थित केला. पुणे आणि दिल्ली या दोन्ही ठिकाणी एकच कायदा लागू असताना एकाच देशात वेगवेगळे नियम कसे लागू होऊ शकतात, असा सवाल त्यांनी केला.
निवडणूक आयोगाच्या निर्णयांवर प्रश्न उपस्थित करणे आणि निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकतेची मागणी करणे हा लोकशाहीतील अधिकार असल्याचे सुळे म्हणाल्या. अचानक मतदारांची संख्या वाढते आणि त्यानंतर मतदार याद्यांमधून नावे वगळली जातात, हा प्रकार नेमका काय आहे, हे समजत नसल्याचे त्यांनी नमूद केले. मतदार याद्यांमधून नावे वगळण्याबाबतची माहिती निवडणूक आयोग आणि सरकारी यंत्रणांकडून मिळत नसल्याचा आरोपही त्यांनी केला.
राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि शेतकऱ्यांना मदत देण्याचा प्रश्न गंभीर असल्याचे सांगत सुळे यांनी सरकारवर टीका केली. झाडे लावण्यासाठी सरकार १८ कोटी रुपयांच्या गाड्या खरेदी करते; मात्र शेतकऱ्यांना पैसे दिले जात नसल्याचे त्या म्हणाल्या. पंतप्रधान कृषी योजना आणि नमो कृषी सन्मान योजनेचे शेवटचे पैसे १३ मार्च रोजी मिळाले असून, त्यानंतर पैसे आले नसल्याचा दावाही त्यांनी केला. शेतकऱ्यांची चेष्टा न करता राजकारण बाजूला ठेवून सरकारने दुष्काळ निवारणाच्या कामाला लागावे, असे आवाहन त्यांनी केले.
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवल्या जात असल्याचे सुळे यांनी स्पष्ट केले. पुणे आणि संभाजीनगर पदवीधर मतदारसंघाच्या जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या असून, त्यामुळे या दोन्ही ठिकाणी पक्षाने उमेदवार उभे केल्याचे त्यांनी सांगितले. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षानेही उमेदवार दिला असला, तरी आघाडी आणि युतीमध्ये अशा गोष्टी घडत असतात, असे त्या म्हणाल्या. शिवसेना हा पक्ष कालही सहकारी होता, आजही आहे आणि उद्याही राहील. शिवसेनेसोबत अद्याप चर्चा सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली.
पवार कुटुंब यंदा दिवाळी साजरी करणार नसल्याचे सांगताना सुळे भावूक झाल्या. आमच्या घरातील कर्ता पुरुष अजितदादा आता नाहीत, त्यामुळे यंदा पवार कुटुंबात दिवाळी नसल्याचे त्यांनी सांगितले. एका बाजूला अजितदादा नसल्याचे दुःख आणि दुसऱ्या बाजूला राज्यातील दुष्काळी परिस्थिती आहे. ज्या लोकांमुळे आम्ही आहोत, तेच लोक अडचणीत असताना आम्ही दिवाळी साजरी करू शकत नाही, असे सुळे म्हणाल्या.


