मुंबई प्रतिनिधी
मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी सर्वोच्च न्यायालय आणि सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याबाबत केलेल्या विधानावरून सुरू झालेला वाद कायम आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने राऊत यांच्याकडून स्पष्टीकरण मागितले असून, त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर माफी मागितल्यानंतरही त्यांना न्यायालयाकडून नोटीस बजावण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर राऊत यांनी आपली भूमिका स्पष्ट करत, नोटीस मिळाली असेल तर न्यायालयीन लढाई लढण्याची तयारी असल्याचे सांगितले. तसेच, गरज पडल्यास तुरुंगात जाण्यासही आपण तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शनिवारी (१७ ऑक्टोबर) प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राऊत यांनी आपल्या विधानामागील भूमिका मांडली. ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. प्रशांत भूषण यांनी सर्वप्रथम ‘एक्स’वर (ट्विटर) यासंदर्भात विधान केले होते. ६ जूनपासून विविध माध्यमांमध्ये या विषयावर चर्चा आणि कार्यक्रम झाले होते. सर्वोच्च न्यायालयाचे ६५ न्यायाधीश मंत्र्यांसोबत लंडन दौऱ्यावर गेल्याच्या मुद्द्यावर प्रशांत भूषण यांनी आश्चर्य व्यक्त केले होते. आपण केवळ त्याच विषयाची आठवण करून दिली, असे राऊत यांनी सांगितले. या प्रकरणात इतरांवर कारवाई होत नसताना याचिकाकर्ते असलेल्या राजकीय नेत्यांनाच लक्ष्य का केले जाते, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
सरन्यायाधीशांनी जारी केलेल्या नोटिशीचा स्वीकार आपल्या वकिलांनी केला असल्याचे राऊत यांनी सांगितले. सर्वोच्च न्यायालयाचा अवमान झाल्याची भावना असेल, तर माफी मागावी, असा सल्ला ज्येष्ठ वकिलांनी दिल्यानंतर आपण माफी मागितल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र, माफी मागूनही नोटीस बजावण्यात आली असेल, तर संबंधित खटला लढणार असल्याचे त्यांनी सांगितले. संविधान आणि सर्वोच्च न्यायालयावर आपली श्रद्धा असल्याचे नमूद करत, “मी माझे कर्तव्य पार पाडले आहे; पण आम्हाला न्याय मिळाला पाहिजे,” अशी भूमिका त्यांनी मांडली.
शिवसेनेचा पक्ष आणि निवडणूक चिन्हाच्या वादाचाही राऊत यांनी यावेळी उल्लेख केला. गेल्या साडेचार वर्षांपासून निवडणूक आयोग आणि न्यायालयाच्या प्रक्रियेमुळे आपल्या पक्षाला अधिकारांपासून वंचित ठेवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. पक्ष आणि चिन्ह ताब्यात घेऊन ज्यांचा मूळ पक्षाशी संबंध नाही, अशा तिसऱ्या पक्षाला निवडणूक लढवण्याचा आणि त्याचा लाभ घेण्याचा मार्ग मोकळा झाला, असा दावा त्यांनी केला. संबंधित पक्ष आजही सत्तेत असल्याचे सांगत त्यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच, ४० आमदारांना अपात्र ठरवण्याबाबतचा निर्णय होऊ शकला नसल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. या सर्व बाबींचा सर्वोच्च न्यायालयाने विचार करून न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
मतदारांच्या नावांबाबतही राऊत यांनी गंभीर मुद्दा उपस्थित केला. एसआयआर प्रक्रियेतून देशातील १३ कोटी मतदारांची नावे वगळण्यात आल्याचा, तर महाराष्ट्रातील दोन कोटी आणि मुंबईतील ६५ लाख मतदारांना वगळण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. या मतदारांनाही न्याय मिळाला पाहिजे, असे ते म्हणाले. आपल्या पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह यासंदर्भातील याचिकेवर सुनावणी सुरू असल्याचे नमूद करत, न्यायासाठीची लढाई आपण सुरूच ठेवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. माफी मागितल्यानंतरही तक्रार स्वीकारून पुढील कारवाई होत असेल, तर त्याला सामोरे जाण्याची तयारी असून, त्यासाठी तुरुंगात जावे लागले तरी आपण मागे हटणार नाही, असे संजय राऊत यांनी सांगितले.


