मुंबई प्रतिनिधी
मुंबई : प्रतिबंधित अन्नपदार्थांची विक्री, साठवणूक आणि वाहतूक रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) राज्यभर विशेष तपासणी मोहीम हाती घेतली आहे. १४ आणि १५ ऑक्टोबर रोजी मुंबई, पुणे, कोकण आणि नागपूर विभागांत करण्यात आलेल्या कारवाईत १८ लाख ८३ हजार ३७८ रुपये किमतीचा प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला. याशिवाय दोन वाहनेही ताब्यात घेण्यात आली असून, या प्रकरणांत १० गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एकूण चार आस्थापनांना सील ठोकण्यात आले आहे.
मुंबई विभागात दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये प्रतिबंधित अन्नपदार्थांची वाहतूक करणारी वाहने पकडण्यात आली. १५ ऑक्टोबर रोजी परिमंडळ-५ मधील अन्न सुरक्षा अधिकारी गौरी जोशी यांनी टाटा पिकअप वाहनातून सात लाख रुपये किमतीचा प्रतिबंधित साठा जप्त केला. या वाहनाची अंदाजित किंमत तीन लाख रुपये असून, याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. परिमंडळ-१२ मध्ये अन्न सुरक्षा अधिकारी तुषार शेळके यांनी गुन्हे शाखा युनिट-१२ च्या मदतीने महिंद्रा बोलेरो पिकअपमधून चार लाख ४४ हजार रुपये किमतीचा प्रतिबंधित साठा हस्तगत केला. या प्रकरणी दहिसर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. दोन्ही प्रकरणांत प्रत्येकी एका आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार कारवाई करण्यात आली.
पुणे विभागात सहा आस्थापनांची तपासणी करताना पाच लाख १५ हजार १९९ रुपये किमतीचा प्रतिबंधित अन्नसाठा जप्त करण्यात आला. या कारवाईत सहा गुन्हे दाखल करून सहा व्यक्तींना अटक करण्यात आली, तर तीन आस्थापनांना सील लावण्यात आले. कोकण विभागात दोन लाख तीन हजार १४९ रुपये किमतीचा प्रतिबंधित साठा जप्त करण्यात आला असून, एका व्यक्तीला अटक करून एका आस्थापनाला सील करण्यात आले.
नागपूर विभागातही अन्न व औषध प्रशासनाने कारवाई करत २१ हजार ३० रुपये किमतीचा प्रतिबंधित अन्नसाठा जप्त केला. या प्रकरणी गुन्हा दाखल करून एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. प्रतिबंधित अन्नपदार्थांची विक्री, साठवणूक आणि वाहतूक करणाऱ्यांविरोधात यापुढेही तपासणी व कारवाई सुरू ठेवण्यात येणार असल्याचे अन्न व औषध प्रशासनाने स्पष्ट केले आहे.


