मालवण प्रतिनिधी
कुडाळ : कुडाळ-मालवणचे शिंदेसेनेचे आमदार निलेश राणे यांच्याबद्दल समाजमाध्यमांवर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी ठाकरे गटाच्या शाखाप्रमुख सचिन धुरी यांना कुडाळ पोलिसांनी रात्री उशिरा त्यांच्या राहत्या घरातून अटक केली. सचिन धुरी हे कुडाळ तालुक्यातील साळगाव येथील ठाकरे सेनेचे शाखाप्रमुख आहेत. यापूर्वीही त्यांनी आमदार निलेश राणे यांच्याबद्दल आक्षेपार्ह मजकूर लिहिल्याचे सांगण्यात आले असून, त्यावेळी पोलिसांनी त्यांना समज दिली होती.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका डिजिटल वृत्तवाहिनीच्या समाजमाध्यमावरील पेजवर आमदार निलेश राणे यांच्याशी संबंधित बातमी प्रसारित करण्यात आली होती. या बातमीच्या टिप्पणी विभागात ‘sachindhuri84’ या खात्यावरून आक्षेपार्ह टिप्पणी करण्यात आली. हा प्रकार समोर आल्यानंतर महायुतीचे कार्यकर्ते आणि शिवसैनिक आक्रमक झाले. संबंधित खातेदारावर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी कुडाळ पोलिसांकडे केली.
या प्रकरणानंतर युवासेनेचे जिल्हाप्रमुख स्वरूप वाळके, तालुकाप्रमुख सागर वालावलकर, उपतालुकाप्रमुख विश्वास पांगुळ, संदेश सुकळवाडकर आणि कुमार राठोड यांनी संबंधित शाखाप्रमुखाच्या घरी जाऊन त्याला जाब विचारला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन कुडाळ पोलिसांनी रात्री उशिरा सचिन धुरी यांना त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेत अटक केली.
या वेळी तालुकाप्रमुख विनायक राणे, शहरप्रमुख तथा नगरसेवक अभिषेक गावडे, पंचायत समिती सदस्य निखिल कांदळगावकर, कुडाळ तालुका संघटक रोहित भोगटे, चेतन पडते, राजवीर पाटील आणि प्रसन्ना गंगावणे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


