पुणे प्रतिनिधी
पुणे : जागतिक वृत्तपत्र विक्रेता दिनानिमित्त अप्पा बळवंत चौकात गुरुवारी (दि. १५) आयोजित कार्यक्रमात पुणे वृत्तपत्र विक्रेता संघाने भारतीय जनता पार्टी-महायुतीच्या पदवीधर मतदारसंघातील उमेदवार डॉ. स्मिता योगेश जाधव यांना जाहीर पाठिंबा दिला. त्यांच्या विजयासाठी संघाच्या वतीने निर्धार व्यक्त करण्यात आला. यावेळी बोलताना डॉ. जाधव यांनी, गेल्या २५ वर्षांपासून दैनिक ‘पुढारी’च्या माध्यमातून लोकांचे प्रश्न सोडवण्याचे संस्कार मिळाले असून, वृत्तपत्र विक्रेता संघाचा हा पाठिंबा विजयाचा मार्ग सुकर करणारा ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.
कार्यक्रमात पुणे वृत्तपत्र विक्रेता संघाचे अध्यक्ष विजय पारगे यांच्या उपस्थितीत डॉ. स्मिताताई जाधव यांच्या हस्ते केक कापून जागतिक वृत्तपत्र विक्रेता दिन साजरा करण्यात आला. या वेळी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी वृत्तपत्र विक्रेत्यांच्या विविध समस्या मांडत त्या सोडवण्यासाठी डॉ. जाधव यांनी आगामी काळात पुढाकार घ्यावा, अशी मागणी केली. संघाचे अध्यक्ष विजय पारगे, उपाध्यक्ष दत्तात्रय पिसे, कार्याध्यक्ष अनंता भिकुले, सचिव अरुण निवंगुणे, खजिनदार संदीप शिंदे यांच्यासह विश्वस्त, पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने वृत्तपत्र विक्रेते उपस्थित होते.
डॉ. स्मिता जाधव यांनी आपण गेल्या २० वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात कार्यरत असल्याचे सांगितले. शिक्षण क्षेत्रातील अनुभव जनतेची सेवा करताना उपयुक्त ठरेल, असे नमूद करत पदवीधर तसेच स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी दिली. तसेच वृत्तपत्र विक्रेत्यांच्या हितासाठी स्वतंत्र ‘वृत्तपत्र विक्रेता महामंडळ’ स्थापन करण्यासाठी आपण विशेष पुढाकार घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ऊन, वारा आणि पाऊस यांची पर्वा न करता अनेक वर्षे घरोघरी बातम्या आणि ज्ञान पोहोचवणाऱ्या वृत्तपत्र विक्रेत्यांच्या समस्या प्राधान्याने सोडवण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
पुणे वृत्तपत्र विक्रेता संघाचे अध्यक्ष विजय पारगे यांनी दैनिक ‘पुढारी’ आणि स्मिता जाधव यांचे संघाशी कौटुंबिक संबंध असल्याचे सांगितले. डॉ. जाधव पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढवत असून, संघाचा त्यांना संपूर्ण पाठिंबा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच सर्व वृत्तपत्र विक्रेते आणि वाचकांनी महायुतीच्या उमेदवार डॉ. स्मिताताई योगेश जाधव यांना प्रचंड बहुमताने विजयी करावे, असे आवाहन पारगे यांनी केले.


