मुंबई प्रतिनिधी
मुंबई : धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपूर येथे जाणाऱ्या प्रवाशांची सोय व्हावी, यासाठी मध्य रेल्वेने २४ विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी), पुणे, सोलापूर, नाशिक, भुसावळ आणि अकोला येथून नागपूरसाठी या विशेष गाड्या धावणार आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी नागपूरला जाणाऱ्या अनुयायांना या गाड्यांचा लाभ घेता येणार आहे.
या २४ विशेष गाड्यांपैकी चार गाड्यांचे आरक्षण खुले करण्यात आले आहे. प्रवाशांना सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर तसेच आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावरून तिकिटे आरक्षित करता येणार आहेत. उर्वरित विशेष गाड्या अनारक्षित स्वरूपात चालवण्यात येणार आहेत. यामध्ये नागपूर-अकोला-नागपूर विशेष गाडीच्या चार फेऱ्यांचा आरक्षित गाड्यांमध्ये समावेश आहे.
धम्मचक्र प्रवर्तन दिनाला ऐतिहासिक महत्त्व आहे. १९५६ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या अनुयायांसह बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता. या ऐतिहासिक दिवसानिमित्त दरवर्षी अनुयायी डॉ. आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी एकत्र येतात. या पार्श्वभूमीवर नागपूरला जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी मध्य रेल्वेने विशेष गाड्यांची व्यवस्था केली आहे.


