मुंबई प्रतिनिधी
मुंबई : मतदार यादीत नाव नोंदणी तसेच दुरुस्ती करण्यासाठी सुरू असलेल्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत दावे व हरकती दाखल करण्याची मुदत आता १२ ऑक्टोबर २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे पात्र नागरिकांना या मुदतीपर्यंत मतदार यादीत नाव नोंदणीसाठी अर्ज करता येणार आहेत.
महाविद्यालयांमध्ये ५ ते ९ ऑक्टोबरदरम्यान पात्र विद्यार्थ्यांना मतदार नोंदणीसाठी प्रोत्साहित केले जाणार आहे. तसेच औद्योगिक आस्थापनांमध्ये १२ ऑक्टोबरपर्यंत मतदार नोंदणीबाबत जनजागृती उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी नागरिकांनी घाबरून तहसील कार्यालयात गर्दी न करता संबंधित बीएलओशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे. विशेष नोंदणी शिबिरे आणि ऑनलाइन सुविधांचा लाभ घ्यावा तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.
प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या पात्र नागरिकांची बीएलओकडून घरोघरी जाऊन पडताळणी केली जात आहे. पात्रता निश्चित झाल्यानंतर संबंधित नागरिकांकडून नमुना क्रमांक ६ भरून घेतला जात आहे.
गृहभेटीच्या वेळी घरी उपलब्ध नसलेल्या नागरिकांसाठी १० आणि ११ ऑक्टोबर रोजी राज्यातील सर्व मतदान केंद्रांवर विशेष नोंदणी शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. या शिबिरांचा लाभ घेऊन पात्र नागरिकांना मतदार यादीत नाव नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे.


