कराड प्रतिनिधी
पुणे-बंगळूर महामार्गावरून कराड शहरात येणाऱ्या वाहनचालकांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. तब्बल ३९ वर्षांपूर्वी टाऊन प्लॅनिंगमध्ये मंजूर करण्यात आलेला पंकज हॉटेलच्या पाठीमागील बाजूने जाणारा ४० फुटी महामार्ग अॅप्रोच रस्ता अखेर खुला करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. हा रस्ता नागरिकांसाठी उपलब्ध झाल्यास कोल्हापूर नाक्यावरील वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होणार आहे.
ज्येष्ठ नेते (कै.) पी. डी. पाटील यांनी १९८७ मध्ये शहराच्या भविष्यातील वाहतुकीचा विचार करून टाऊन प्लॅनिंगमध्ये महामार्गाचा अॅप्रोच रस्ता मंजूर केला होता. मात्र, विविध अडचणींमुळे गेल्या अनेक वर्षांपासून हा मार्ग प्रत्यक्षात खुला होऊ शकला नव्हता. दरम्यान, पुणे-बंगळूर महामार्गावर उड्डाणपूल उभारण्यात आल्याने शहरात येणाऱ्या वाहतुकीसाठी पर्यायी मार्गाची गरज अधिक प्रकर्षाने जाणवत होती.
याच पार्श्वभूमीवर कराड पालिकेने ३९ वर्षांपूर्वी मंजूर झालेल्या या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पावले उचलली आहेत. लोकशाही आघाडीचे अध्यक्ष जयंत पाटील आणि सहकारी नगरसेवकांनी प्रस्तावित रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी रस्ता नेमका कोणत्या ठिकाणाहून सुरू करून कुठे जोडता येईल, उपलब्ध जागा किती आहे, आवश्यक रुंदी किती असावी तसेच भविष्यातील वाढती वाहतूक लक्षात घेता या मार्गाचा कितपत उपयोग होईल, याबाबत प्राथमिक पाहणी करण्यात आली.
कोल्हापूर नाक्यावरील वाहतूक कोंडीला पर्याय
कराड शहरातील कोल्हापूर नाका परिसरात सातत्याने वाहतूक कोंडी होत असून, या भागात अपघातांच्याही घटना घडत असतात. महामार्गावरून शहरात येणाऱ्या वाहनांसाठी थेट पर्यायी मार्ग उपलब्ध झाल्यास या परिसरावरील वाहतुकीचा भार कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रस्तावित ४० फुटी रस्ता कराडच्या वाहतूक व्यवस्थेसाठी महत्त्वाचा ठरणार आहे.
याबाबत जयंत पाटील यांनी सांगितले की, ‘‘ज्येष्ठ नेते (कै.) पी. डी. पाटील यांनी १९८७ मध्ये टाऊन प्लॅनिंगमध्ये महामार्गाचा अॅप्रोच रस्ता मंजूर केला होता. त्या रस्त्याची नगरसेवक, बांधकाम विभागाचे अधिकारी आणि टाऊन प्लॅनिंग विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत पाहणी करण्यात आली आहे. कोल्हापूर नाक्यावर होणारी वाहतूक कोंडी आणि अपघात लक्षात घेता हा रस्ता एक चांगला पर्याय ठरू शकतो.’’
पहिल्याच सभेत विषयाला मंजुरी
नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव आणि उपनगराध्यक्ष पोपटराव साळुंखे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर झालेल्या पहिल्याच सभेत या रस्त्याचा विषय गांभीर्याने घेत मंजुरी दिल्याचेही जयंत पाटील यांनी सांगितले. त्यामुळे आता प्रत्यक्ष कार्यवाहीला वेग येण्याची शक्यता आहे.
दरम्यान, हा रस्ता लवकरच नागरिकांसाठी खुला करण्यात येणार असल्याने कराड शहरातील वाहतूक व्यवस्थेत महत्त्वाचा बदल होण्याची अपेक्षा आहे. महामार्गावरून शहरात येणाऱ्या वाहनांना पर्यायी थेट मार्ग मिळाल्यास कोल्हापूर नाका परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्यासोबतच शहरातील अंतर्गत वाहतूक अधिक सुरळीत होण्यास मदत होणार आहे. तब्बल चार दशकांच्या प्रतीक्षेनंतर हा मार्ग प्रत्यक्षात खुला होणार असल्याने कराडकरांचे लक्ष आता पालिकेच्या पुढील कार्यवाहीकडे लागले आहे.


