प्रसाद चाफेकर
विद्यानंद बापट यांनी डीजेच्या दणदणाटाला विरोध करण्याची भूमिका घेतली, हा त्यांचा मूलभूत हेतू निश्चितच चुकीचा नव्हता. उत्सवांच्या नावाखाली वाढणारा ध्वनिप्रदूषणाचा त्रास, त्याचा ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, रुग्ण आणि सर्वसामान्य नागरिकांवर होणारा परिणाम याकडे लक्ष वेधणे आवश्यकच आहे. मात्र, बापट यांनी आपण नास्तिक असल्याचे जाहीरपणे सांगून आपल्या चांगल्या भूमिकेला अनावश्यक वादाचे स्वरूप दिले, असे म्हणावे लागेल. त्यांच्या हातात उत्सवप्रिय मंडळींना आयते कोलीत मिळाले आणि मूळ प्रश्न बाजूला पडला.
एखादा व्यक्ती नास्तिक असो अथवा आस्तिक, त्याचा वैयक्तिक श्रद्धाविषयक दृष्टिकोन हा त्याचा अधिकार आहे. पण सार्वजनिक प्रश्न मांडताना त्या भूमिकेचा केंद्रबिंदू होऊ नये. बापट यांचा खरा मुद्दा ‘डीजे नको, शांतता हवी’ एवढाच राहिला असता, तर त्यांना मिळालेला व्यापक लोकसमर्थनाचा पाया आणखी मजबूत झाला असता. समाजमाध्यमांवर पहिल्या काही दिवसांत त्यांना मिळालेला प्रतिसाद हेच दाखवून देत होता.
दुर्दैवाने, नास्तिकतेचा मुद्दा पुढे आल्यावर विरोधकांना त्यांच्या मूळ भूमिकेऐवजी त्यांच्या श्रद्धेविषयी बोलण्याची संधी मिळाली. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून त्यांना डीजेच्या तालावर नाचवणारे व्हिडिओ प्रसारित होणे, ही त्याच वादाची पुढची पायरी ठरली. एखाद्याच्या सामाजिक भूमिकेवर मतभेद असू शकतात; मात्र व्यक्तीच्या श्रद्धेची खिल्ली उडवणे हा चर्चेचा दर्जा खाली आणणारा प्रकार आहे.
मुळात प्रश्न बापट आस्तिक की नास्तिक, हा नाही. प्रश्न आहे तो कायद्याने निश्चित केलेल्या ध्वनिमर्यादेचा आणि नागरिकांच्या शांततेचा.
साताऱ्यात गेल्या वर्षापासून विविध २१ संस्थांनी डीजेच्या वाढत्या दणदणाटाविरोधात भूमिका घेतली आहे. गेल्या वर्षी या प्रयत्नांना मोठ्या प्रमाणावर यश मिळाले. यंदाही संस्थांनी अनंत चतुर्दशीच्या दिवशीच मोर्चा काढून डीजेच्या प्रश्नावर थेट आवाज उठवला. उत्सव साजरा करण्याचा अधिकार आणि इतर नागरिकांना शांततेत जगण्याचा अधिकार, या दोन्हींचा समतोल राखण्याचा प्रयत्न या भूमिकेतून दिसून आला. त्याचा परिणाम म्हणून साताऱ्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा शांतता अधिक जाणवली, असा अनुभव अनेकांनी व्यक्त केला.
मग पुण्यात नेमके काय घडले?
मानाच्या गणपतींचे विसर्जन झाल्यानंतरही दुसऱ्या दिवसापर्यंत डीजेचा दणदणाट सुरू राहिल्याचे चित्र समोर आले. उत्सवाचा आनंद साजरा करण्याला कोणाचाही विरोध नाही. पण आनंदाची सीमा जेव्हा इतरांच्या कानठळ्या बसवणाऱ्या आवाजापर्यंत पोहोचते, तेव्हा प्रशासनाने हस्तक्षेप करणे अपेक्षित असते. अलका चौकातील दृश्ये तर आणखी गंभीर प्रश्न उपस्थित करणारी होती. वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी उपस्थित असतानाही मोठ्या आवाजात डीजे वाजत असल्याचे चित्र दिसले. अधिकारी कानात हेडफोन घालून बसलेले दिसत असतील, तर सामान्य नागरिकांनी याचा अर्थ काय घ्यायचा?
कायद्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पोलिसांची आहे. उत्सव मंडळे असोत किंवा अन्य कोणताही समूह कायद्यापेक्षा कोणीही मोठे नाही, हा संदेश प्रशासनाने कृतीतून द्यायला हवा. पोलिसांनी कोणत्याही राजकीय किंवा सामाजिक दबावाला बळी न पडता नियमभंग झाल्यास कायदेशीर कारवाई केली पाहिजे. वचक म्हणजे हिंसा नव्हे; वचक म्हणजे कायद्याची निःपक्ष आणि तत्काळ अंमलबजावणी.
लोकप्रतिनिधींना आपले कार्यकर्ते आणि मतदार सांभाळायचे असतात; प्रशासनाला मात्र संपूर्ण नागरिकांचे हित आणि कायदा सांभाळायचा असतो. त्यामुळे उत्सवाच्या काळात कायदा मोडला जात असेल, तर पोलिसांनी स्पष्ट भूमिका घेतली पाहिजे. आवाजाची मर्यादा ओलांडणाऱ्या यंत्रणांवर कारवाई, उपकरणे जप्त करणे, संबंधितांवर गुन्हे दाखल करणे आणि न्यायालयीन आदेश व कायदेशीर नियमांची अंमलबजावणी करणे हे सर्व मार्ग प्रशासनाकडे उपलब्ध आहेत.
श्रद्धेचा प्रश्नही याच ठिकाणी महत्त्वाचा ठरतो. श्रद्धा ही व्यक्तीच्या मनाशी जोडलेली गोष्ट आहे. तिचा आदर झाला पाहिजे. त्याच वेळी श्रद्धेच्या नावाखाली इतरांच्या अधिकारांवर गदा येऊ नये, याची काळजी घेणेही तितकेच आवश्यक आहे. गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य भाग आहे; मात्र त्याच्या उत्साहाला ध्वनिप्रदूषणाची जोड देणे ही परंपरेची अपरिहार्यता नाही.
बापट यांचा उद्देश चांगला असला तरी त्यांनी नास्तिकतेचा मुद्दा पुढे आणून आपल्या मूळ लढ्याचे नुकसान केले, हे मान्य करावे लागेल. लोकांच्या श्रद्धेला थेट आव्हान दिल्यास त्याची प्रतिक्रिया उमटणारच. पण बापटांच्या भूमिकेला विरोध करताना आस्तिकांनीही आपली सुसंस्कृतता, संयम आणि विवेक गमावता कामा नये.
कारण शेवटी खरी लढाई आस्तिक विरुद्ध नास्तिक अशी नाही. ती कायदा विरुद्ध कायद्याचा भंग, उत्सवाचा आनंद विरुद्ध ध्वनिप्रदूषण, आणि व्यक्तिस्वातंत्र्य विरुद्ध इतरांच्या शांततेच्या अधिकाराचा समतोल यांची आहे.
श्रद्धेपुढे शहाणपण चालत नाही, असे म्हटले जाते. पण श्रद्धेचे रक्षण करण्यासाठी शहाणपण सोडून देणेही योग्य नाही. उत्सव आपले आहेत, देव आपले आहेत, परंपरा आपली आहे; पण शहरही आपलेच आहे आणि त्या शहरात शांततेने जगणारे नागरिकही आपलेच आहेत. त्यामुळे डीजेच्या दणदणाटापेक्षा कायद्याचा आवाज मोठा असला पाहिजे. आणि तो आवाज पोलिसांनी स्पष्टपणे ऐकवला पाहिजे.


