नागपूर प्रतिनिधी
नागपूर : नोकरीवरून काढून टाकल्याचा राग मनात धरून माजी कर्मचाऱ्याने मालकाच्या गॅरेजलाच आग लावल्याची धक्कादायक घटना नागपूर शहरातील कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. बँक कॉलनी परिसरातील ‘दिवेश होंडा सर्व्हिस’ गॅरेजला लावलेल्या या आगीत तब्बल २० दुचाकी जळून खाक झाल्या असून, सुमारे पाच लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आगीच्या झळा शेजारील क्लिनिकपर्यंत पोहोचल्याने तेथेही सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, गॅरेजचे मालक सतीश यादव यांच्या आस्थापनेत राजू महेंद्रकर हा काम करत होता. त्याला दारूचे व्यसन असल्याने सुमारे दोन महिन्यांपूर्वी कामावरून कमी करण्यात आले होते. नोकरी गेल्याचा राग राजूच्या मनात होता. त्यातूनच त्याने गॅरेजला आग लावल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
सीसीटीव्हीत कैद झाला प्रकार
गॅरेजला आग लागल्याची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली. अग्निशमन दल आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. मात्र, तोपर्यंत गॅरेजमध्ये उभ्या असलेल्या अनेक दुचाकी आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या होत्या.
दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता एक संशयित व्यक्ती गॅरेज परिसरात आग लावताना दिसून आल्याचे समोर आले आहे. या फुटेजच्या आधारे कपिलनगर पोलिसांकडून संशयिताचा शोध सुरू आहे. घटनास्थळावरील परिस्थिती, सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्यांच्या आधारे तपासाला वेग देण्यात आला आहे.
शेजारील क्लिनिकलाही फटका
गॅरेजमधील आगीची तीव्रता एवढी होती की, त्याच्या झळा शेजारील डॉ. विकास गिरी यांच्या क्लिनिकपर्यंत पोहोचल्या. आगीमुळे क्लिनिकचेही सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे प्राथमिक माहितीवरून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या घटनेतील एकूण आर्थिक नुकसान आणखी वाढण्याची शक्यता आहे.
सुरतमधील घटनेचीही आठवण
दरम्यान, काही दिवसांपूर्वी गुजरातमधील सुरतमध्येही कामावरून निर्माण झालेल्या वादातून आगीची धक्कादायक घटना घडली होती. थकीत दहा हजार रुपयांचा पगार न मिळाल्याच्या रागातून एका कर्मचाऱ्याने कापड दुकानाला आग लावल्याचे प्रकरण समोर आले होते. या आगीत मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे वृत्त होते.
नागपुरातील घटनेत मात्र नोकरीवरून काढून टाकल्याचा राग आगीच्या रूपाने बाहेर पडल्याचा प्राथमिक संशय आहे. पोलिस तपास पूर्ण झाल्यानंतर या घटनेमागील नेमके कारण आणि आरोपीची भूमिका स्पष्ट होणार आहे.


