जालना प्रतिनिधी
मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान मनोज जरांगे पाटील यांच्या वापरातील ‘डिफेंडर’ कारची चांगलीच चर्चा झाली होती. आलिशान कार वापरत असल्यावरून जरांगे पाटील यांच्यावर विरोधकांकडून आणि काही मराठा कार्यकर्त्यांकडून टीका करण्यात आली होती. अखेर या चर्चेला पूर्णविराम देत मनोज जरांगे पाटील यांनी ही डिफेंडर कार तिच्या मूळ मालकाकडे परत केली आहे.
छत्रपती संभाजीनगर येथील गॅलक्सी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर मनोज जरांगे पाटील बुधवारी अंतरवाली सराटीत दाखल झाले. गावात पोहोचल्यानंतर त्यांनी डिफेंडर कारच्या मालकाला फोन करून गाडी परत घेऊन जाण्यास सांगितल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर कारचे मालक सुभाष भोसले यांनी ही गाडी परत नेल्याचे सांगण्यात येत आहे.
गेल्या काही दिवसांपासून जरांगे पाटील यांच्या वापरातील ही डिफेंडर कार राजकीय आणि सामाजिक चर्चेचा विषय ठरली होती. या कारवरून अमोल खुणे, अजय बारस्कर यांच्यासह काहींनी जरांगे पाटील यांच्यावर टीका केली होती. त्यामुळे कारच्या वापराबाबत विविध प्रश्न उपस्थित केले जात होते.
दरम्यान, ही डिफेंडर कार आपली वैयक्तिक मालमत्ता नसून एका समाजबांधवाने वापरण्यासाठी दिली असल्याचे जरांगे पाटील यांनी यापूर्वी स्पष्ट केले होते. या कारचे मालक सुभाष भोसले हे सांगोला तालुक्यातील चिकमहूद येथील असल्याची माहिती यापूर्वी समोर आली होती.
रुग्णालयातून डिस्चार्ज झाल्यानंतर अंतरवाली सराटीत परतताच जरांगे पाटील यांनी गाडी परत करण्याचा निर्णय घेतल्याने या प्रकरणाला पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आलिशान वाहनाच्या वापरावरून होत असलेल्या टीकेला या निर्णयातून त्यांनी पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांच्या समर्थकांकडून सांगितले जात आहे. मात्र, या निर्णयामागील नेमकी भूमिका काय, याबाबत जरांगे पाटील यांच्याकडून अधिकृत स्पष्टीकरण अद्याप समोर आलेले नाही.


