सातारा प्रतिनिधी
सातारा, खंडाळा : घरातील किरकोळ कारणांवरून होत असलेल्या त्रासाला कंटाळून वडिलांनीच चुलत भावाच्या मदतीने आपल्या १८ वर्षीय मुलीचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जेवण करण्याच्या बहाण्याने मुलीला सोबत नेऊन तिच्या नाकातोंडात चटणीची पूड टाकून तोंड दाबल्याने तिचा मृत्यू झाल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी वडिलांसह त्यांच्या चुलत भावाला ताब्यात घेतले आहे.
हर्षदा हनुमंत जाधव (वय १८) असे मृत तरुणीचे नाव आहे. या प्रकरणी हणुमंत दामोदर जाधव (सध्या रा. आंबेगाव खुर्द, पुणे) आणि त्यांचे चुलत भाऊ बाळू अंकुश जाधव (सध्या रा. इंदोली, तळेगाव दाभाडे, पुणे) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दोघेही मूळचे यावली, ता. मोहोळ, जि. सोलापूर येथील रहिवासी आहेत.
पोलिसांच्या तपासानुसार, हर्षदाला जेवणासाठी सोबत घेऊन जाण्याच्या बहाण्याने दोघे निघाले. त्यानंतर खेड शिवापूर ते सासवड मार्गावर तिच्या नाकातोंडात चटणीची पूड टाकून तिचे नाक व तोंड दाबण्यात आले. यामध्ये तिचा मृत्यू झाला. त्यानंतर तिचा मृतदेह भोर-शिंदेवाडी-शिरवळ मार्गावरील राजेवाडी येथे टाकण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. हा प्रकार १३ सप्टेंबर रोजी घडल्याचे पोलिसांनी सांगितले.
घटनेनंतर स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरवळ पोलिसांनी तपास सुरू केला. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी हणुमंत जाधव आणि बाळू जाधव यांना ताब्यात घेतले. घरातील किरकोळ कारणांवरून हा प्रकार केल्याचे तपासात समोर आले असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.


