सातारा प्रतिनिधी
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या राजकारणाला वेग आला असून, जागावाटपाचा तिढा सुटला तर जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध होऊ शकते, असे सूचक विधान सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले आहे. जिल्हा बँकेच्या बहुतांश मतदारांवर महायुतीच्या नेत्यांचा प्रभाव असून, निकालाला निर्णायक वळण देणारे मतदान महाविकास आघाडीकडे नसल्याचा दावाही त्यांनी केला. महायुतीच्या विचारांचे तब्बल ९५ टक्के मतदार असल्याचे सांगत, योग्य तोडगा निघाल्यास निवडणूक बिनविरोध करण्यासाठी ताकदीने प्रयत्न करणार असल्याचे शिवेंद्रराजेंनी स्पष्ट केले.
सातारा विकास सेवा सहकारी सोसायटी मतदारसंघातून शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील महायुतीची भूमिका स्पष्ट केली. त्यामुळे आगामी काळात जागावाटपाचा फॉर्म्युला, इच्छुकांची माघार आणि बिनविरोध निवडणुकीची शक्यता याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
शिवेंद्रराजे म्हणाले, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक महायुती म्हणून लढण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या निर्देशानुसार घेण्यात आला आहे. त्याचबरोबर बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याचाही सर्वांचा प्रयत्न आहे. मात्र, महायुतीतील जागावाटपाचा अंतिम फॉर्म्युला अद्याप निश्चित झालेला नाही. सर्व इच्छुकांनी शेवटच्या दिवशी अर्ज दाखल केले असून, छाननीनंतर जागावाटपाबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.
‘बँक चांगली चालतेय, म्हणून इच्छुकांची गर्दी’
जिल्हा बँक चांगल्या पद्धतीने चालत असल्यामुळे या संस्थेत काम करण्याची इच्छा अनेकांची आहे. त्यामुळेच उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या इच्छुकांची संख्या मोठी आहे, असे शिवेंद्रराजेंनी सांगितले. जागावाटपाचा निर्णय झाल्यानंतर संबंधित पक्षांनी आपल्या पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची माघार घेण्याची जबाबदारी पार पाडावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
महायुतीतील जागावाटपाबाबत बोलताना शिवेंद्रराजे म्हणाले, ‘‘भाजपला ११ आणि शिवसेना-राष्ट्रवादीला १० जागा, असा कोणताही फॉर्म्युला अद्याप निश्चित झालेला नाही. मी, जयकुमार गोरे, मकरंदआबा पाटील आणि शंभूराज देसाई कॅबिनेट बैठकीमुळे मुंबईत होतो. त्यामुळे सध्या केवळ इच्छुकांनी अर्ज भरून ठेवले आहेत. पुढील निर्णय चर्चेतून होईल.’’
‘मतांच्या प्रमाणात जागा मिळाव्यात’; भाजपचा आग्रह
जिल्हा बँकेतील जागावाटप हे मतांच्या प्रमाणानुसार व्हावे, अशी भाजपची भूमिका असल्याचेही शिवेंद्रराजेंनी स्पष्ट केले. कोणत्या पक्षाकडे किती मतदान आहे, याची माहिती सर्वांनाच आहे. त्यामुळे तीनही पक्षांच्या कार्यकर्त्यांचा सन्मान होईल, अशा पद्धतीने सन्मानजनक जागावाटप व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
‘‘जिल्हा बँकेत आमचे मतदान एकमुखी आणि एकगठ्ठा आहे. आमच्याकडे सर्वाधिक मतदान असल्याने एखादी तरी जागा जास्त मिळावी, असा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे,’’ असे शिवेंद्रराजे म्हणाले.
उदयनराजेंची भेट बँकेच्या निवडणुकीसाठी नव्हती
उदयनराजे भोसले यांच्यासोबत झालेल्या भेटीबाबतही शिवेंद्रराजेंनी स्पष्टीकरण दिले. उदयनराजेंची भेट ही जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या संदर्भातील नव्हती. उलट जिल्हा बँकेची निवडणूक पक्षीय पातळीवर न होता पक्षविरहित पद्धतीने व्हावी, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. आमची वाटचालही त्याच दिशेने सुरू असल्याचे शिवेंद्रराजेंनी सांगितले.
जयकुमार गोरे, उदयसिंह पाटील उंडाळकर आणि मकरंद पाटील यांच्यात झालेल्या बैठकीबाबतही त्यांनी भाष्य केले. ही बैठक जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी नव्हती, असे जयकुमार गोरे यांनी स्पष्ट केले असल्याचे शिवेंद्रराजेंनी नमूद केले.
‘शंभूराज देसाई महायुतीतच; बँक निवडणुकीत आमच्यासोबत’
जिल्हा बँकेच्या निवडणुकीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीला पालकमंत्री शंभूराज देसाई उपस्थित होते. त्या दिवशी जयकुमार गोरे सोलापूरला गेल्याने बैठकीला उपस्थित राहू शकले नव्हते. मात्र, शंभूराज देसाई हे महायुतीत असून जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आमच्यासोबत असल्याचा दावा शिवेंद्रराजेंनी केला.
दरम्यान, मकरंदआबा पाटील यांनी शंभूराज देसाई यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला होता. ‘‘मला सुनावणीच्या निमित्ताने मुंबईला जावे लागत आहे. तुम्ही चर्चा करा, मी तुमच्यासोबत आहे,’’ असे देसाई यांनी सांगितल्याचे शिवेंद्रराजेंनी स्पष्ट केले.
आता छाननीनंतर जागावाटपाची चर्चा निर्णायक टप्प्यात जाणार असून, महायुतीतील इच्छुकांची माघार घडवून आणण्यात नेत्यांना कितपत यश येते आणि जिल्हा बँकेची निवडणूक खरोखरच बिनविरोध होते का, याकडे सातारा जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.


