सातारा प्रतिनिधी
सातारा : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत, तिच्या पोटातील मूल आपले नसल्याच्या गैरसमजातून पतीने तिचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे ज्या गर्भाच्या संशयातून पत्नीला संपवण्यात आले, शवविच्छेदनानंतर ती गरोदरच नसल्याचे स्पष्ट झाले. या प्रकारामुळे सातारा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
माळशिरस तालुक्यातील मांडवे येथे राहणाऱ्या राहुल कोळी (४०) याला पत्नी मनिषाच्या खूनप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. पोलिसांच्या तपासात राहुलच्या संशयी वृत्तीमागील धक्कादायक घटनाक्रम समोर आला आहे.
तिसरे लग्न; तरीही संसारात सतत वाद
राहुलची यापूर्वी दोन लग्ने झाली होती. मात्र, दोन्ही संसार टिकले नाहीत. त्यानंतर त्याने मनिषासोबत तिसरे लग्न केले. राहुल गावात सेंट्रिंगचे काम करायचा. मितभाषी स्वभावामुळे तो फारसा कोणाच्या चर्चेत नसायचा. मात्र, घरात पत्नीच्या चारित्र्यावरून त्यांच्यात वारंवार वाद होत असल्याचे तपासात समोर आले.
मनिषा गर्भवती असल्याचे तिने राहुलला सांगितल्यानंतर त्याचा संशय आणखी बळावला. ‘तुझ्या पोटातील मूल माझं नाही,’ असे तो तिला वारंवार म्हणत होता. मनिषाने आपली बाजू स्पष्ट करत ‘तुमची शपथ, तुमचंच मूल आहे,’ असे सांगूनही त्याचा संशय दूर झाला नाही.
गर्भपाताच्या बहाण्याने रात्री घराबाहेर नेले
पोलिसांच्या माहितीनुसार, यापूर्वीही राहुल मनिषावर संशय घेऊन तिला गर्भपाताच्या गोळ्या देत असल्याचे समोर आले आहे. यावेळीही गर्भपात करण्यासाठी घेऊन जात असल्याचे सांगून त्याने तिला रात्री कारमध्ये बसवले.
रात्री उशिरा कारमधून बाहेर पडताना मनिषाने ‘एवढ्या रात्री कुठे जायचं?’ असा प्रश्न केला. मात्र, राहुलने तिला काहीही स्पष्ट सांगितले नाही.
कारमध्ये फावडे; सुनसान ठिकाणी पत्नीवर हल्ला
राहुल कारमधून सातारा जिल्ह्यातील एका सुनसान परिसरात गेला. तेथे कार थांबवल्यानंतर त्याने सोबत आणलेल्या फावड्याने मनिषाच्या तोंडावर वार केल्याचे तपासात समोर आले आहे. गंभीर दुखापत झाल्यानंतर मनिषाचा मृत्यू झाला.
त्यानंतर तिचा मृतदेह शेतालगत टाकून राहुल तेथून पसार झाला.
१२ दिवस पत्नी बेपत्ता, तरी पोलिसांत तक्रार नाही
मनिषा गेल्या सुमारे १२ दिवसांपासून बेपत्ता होती. मात्र, राहुलने तिच्या बेपत्ता होण्याची पोलिसांत तक्रार केली नाही किंवा घरातील इतरांना याबाबत माहिती दिली नाही, असे तपासात समोर आले आहे.
मनिषाचे आई-वडील हयात नसल्याने तिच्या बेपत्ता होण्याबाबत तातडीने विचारणा करणारे कोणी नसल्याचा गैरफायदा राहुलने घेतल्याचा पोलिसांचा तपास आहे.
शवविच्छेदनाने संशयाचा पर्दाफाश
खूनप्रकरण समोर आल्यानंतर मनिषाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यावेळी ती गरोदर नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे ज्या कारणावरून राहुलने पत्नीवर संशय घेतला आणि तिचा जीव घेतला, त्या संशयालाच शवविच्छेदनाच्या अहवालाने छेद दिला.
एक वर्षाची चिमुकली झाली पोरकी
राहुल आणि मनिषाला एक वर्षांची मुलगी आहे. आईच्या खुनानंतर आणि वडिलांच्या अटकेनंतर ही चिमुकली आई-वडिलांच्या प्रेमापासून वंचित झाली आहे. सध्या तिचा सांभाळ राहुलची आई करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
संशयाच्या विळख्यातून सुरू झालेल्या कौटुंबिक वादाचा शेवट पत्नीच्या हत्येत झाला; मात्र मृत्यूनंतर झालेल्या शवविच्छेदनाने राहुलने पत्नीवर घेतलेल्या संशयामागील वास्तवच उघड केले.


